ऑनलाइन लोकमत
कोल्लम, दि. 16 - लैंगिक शोषण करत असल्याने साधूचं गुप्तांग कापण्यात आलेल्या प्रकरणाला नवीन वळण मिळालं आहे. हे प्रकरण पुर्णपणे उलटलं आहे. गुप्तांग कापल्याप्रकरणी मुख्यमंत्री पी विजयन यांच्याकडून शाबासकी मिळवणा-या 23 वर्षीय पीडित तरुणीने आपली साक्ष मागे घेतली असून, साधूला क्लीन चीट दिली आहे.
मे महिन्यात पीडितेने पोलिसांना जबाब दिला होता की, गेल्या कित्येक वर्षांपासून प्रथा आणि पूजेच्या नावे 54 वर्षीय श्रीहरी उर्फ गणेशानंद स्वामी आपलं लैंगिक शोषण करत होता. मात्र आता याच मुलीने विशेष न्यायालयात साधूला क्लीन चीट दिली आहे. श्रीहरी उर्फ गणेशानंद स्वामी यांच्या वकिलाने विशेष न्यायालयात पत्र सादर करत पीडितेची काहीच तक्रार नसल्याचा दावा केला आहे. वकिलाने न्यायालयात पीडितेने लिहिलेलं पत्र सादर केलं आहे, ज्यामध्ये श्रीहरी उर्फ गणेशानंद स्वामीएक भला आणि चांगला व्यक्ती असल्याचं म्हटलं आहे.
बचावपक्षाचे वकिल अजित कुमार यांनी सांगितलं की, 13 जून रोजी आपल्याला हे पत्र मिळालं. पत्रात तरुणीने पोलिसांनी साधूवर लावलेले सर्व आरोप खोटे असून, त्याने कधीच आपलं लैंगिक शोषण केलं नसल्याचं सांगितलं आहे.
विशेष म्हणजे याआधी तरुणीच्या आईनेही पोलिसांना पत्र लिहून गंगेशनंद यांनी आपल्या मुलीचं कधीच लैंगिक शोषण केलं नसल्याचा सांगितलं होतं. पत्राच्या सत्यतेबद्दल विचारलं असता, एका मल्याळम टीव्ही चॅनेलला मुलाखत देताना पीडित तरुणीने आपणंच ते पत्र पाठवल्याचं सांगितलं आहे. याप्रकरणी 19 जूनला पुढील सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण -
श्रीहरी उर्फ गणेशानंद स्वामी पीडित तरुणी लहान म्हणजेच शाळेत असल्यापासून बलात्कार करत असल्याचा आरोप करत तरुणीने साधूचं गुप्तांगच कापून टाकलं होतं. यानंतर तरुणीने स्वत: पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली होती. सुडापोटी आपण हे केलं असून स्वसंरक्षणासाठी हे पाऊल उचललं असल्याची कबुली तिने पोलिसांकडे दिली होती. पीडित तरुणीचे पालक या स्वामीचे भक्त आहेत. कोल्लम येथील एका आश्रमात या साधूचं वास्तव्य होतं.
मात्र नंतर आरोपी साधूने त्या तरूणीने नाही आपण स्वतःच आपलं गुप्तांग कापल्याचा दावा केला होता. आरोपी साधूने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये आपण स्वतःच आपलं गुप्तांग कारण ते निरूपयोग होतं असं म्हटलं होतं. शरीराचा तो भाग माझ्या काही कामाचा नव्हता म्हणून मी तो भाग कापून टाकला असं हा साधू म्हणाला होता.