ऑनलाइन लोकमतगुजरात, दि. 15 - अहमदाबादमध्ये पॅरोलवर बाहेर असलेली साध्वी जयश्री गिरी फरार झाली आहे. साध्वी बुधवारी हिमालय मॉलमध्ये गेली होती. तिथे शौचालयात जाण्याच्या बहाण्यानं ती पसार झाली आहे. पालनुपरमधून अटक केलेली साध्वी साबरमती तुरुंगात जेरबंद होती. साध्वी जयश्री गिरी वैद्यकीय पॅरोलवर बाहेर आली होती. रुग्णालयातील उपचारानंतर साध्वी चित्रपट पाहण्याच्या निमित्तानं मॉलमध्ये गेली होती. तिच्यासोबत पोलीसही होते. मॉलमधील सीसीटीव्ही फुटेजनुसार, साध्वीनं मॉलमध्ये जाऊन पहिल्यांदा शॉपिंग केली. त्यानंतर तिने बॉडी मसाजही केला. शौचालयासाठी जाण्याच्या बहाण्यानं पोलिसांना चकवा देऊन ती फरार झाली. साध्वी बाहुबली 2 चित्रपट पाहण्यासाठी मॉलमध्ये आली होती. या प्रकारानंतर पोलीस साध्वी जयश्री गिरी यांच्या तपासाला लागले आहेत. अहमदाबाद क्राइम ब्रँचनं 6 जणांना अटक केली आहे. त्यात 4 पोलिसांचाही समावेश आहे. त्यातील दोन साध्वीचे सहकारी आहेत. साध्वी जयश्री गिरीवर हत्या प्रकरणात खटला सुरू आहे. तसेच साध्वीवर लोकांना घाबरवणे, धमकावणे आणि पैसे उधारीवर देण्यासारखे अनेक गंभीर आरोप आहेत. साध्वीच्या विरोधात एका व्यापा-यानंही तक्रार केली होती. साध्वीवर 5 कोटींचा चुना लावण्याचा आरोप आहे. नोटाबंदीच्या काळात साध्वीला अटक केली होती. त्यावेळी तिच्या घरातून 2 हजार रुपयांच्या जवळपास 1.5 कोटी रुपयांच्या नोटा सापडल्या होत्या. तसेच दोन किलो सोनं जप्त केलं होतं. साध्वी जयश्री गिरी नोटबंदीनंतर एका गायकावर 2 हजारांच्या नोटा उडवल्याप्रकरणीही चर्चेत आली होती.