जयपूर - भाजपाआमदार माहेश्वरी यांनी शहीद हमेंत करकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. भगवा दहशतवादाच्या नावाखाली भारत देशाला बदनाम करण्याच्या कट-कारस्थानात हेमंत करकरे यांचा सहभाग होता, असे राजस्थानमधील भाजपाआमदार माहेश्वर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे. त्यामुळे साध्वी प्रज्ञासिंग यांच्यानंतर आता माहेश्वरी यांनीही शहीद हेमंत करकरेंना लक्ष्य केलं आहे.
भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर, देशभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली. तर, विरोधकांनीही साध्वी प्रज्ञा यांच्या विधानावरुन भाजपाला लक्ष्य केले होते. त्यानंतर, प्रज्ञा ठाकूर यांनी आपल्या विधानबद्दल जाहीरपणे माफी मागितली होती. मात्र, आता राजस्थानमधील भाजपा आमदार किरण माहेश्वरी यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त विधान केले आहे.
दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला म्हणून, साध्वी प्रज्ञा यांना दिलेली अमानवीय छळाची वागणूक किंवा गुन्हा कमी होत नाही. प्रामाणिकपणा किंवा धाडसी बाणा दाखवल्यामुळे, कुठल्याही निरपराध नागरिकाला खोट्या प्रकरणात फसविण्याचा परवाना तुम्हाला मिळत नाही, असेही माहेश्वरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबद्दलच्या विधानामुळे भाजपाच्या भोपाळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह वादात सापडल्या होत्या. त्यानंतर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या विधानानं राजकीय वर्तुळात दंग निर्माण झाले. हेमंत करकरे कर्तव्यावर असताना त्यांचे निधन झाले. त्यामुळे त्यांना शहीद मानले जाईल,' असे महाजन म्हणाल्या. मात्र त्यांनी करकरेंच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून केलेल्या कामगिरीबद्दल संशय व्यक्त केला. तर, आता आमदार माहेश्वरी यांनी केलेल्या ट्विटमुळे पुन्हा एकदा भाजपाला लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. आमदार किरण माहेश्वरी यांच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारेच हे ट्विट करण्यात आले आहे. मात्र, अरुण शौरी नावाच्या एका फॅनच्या अकाऊंटला उत्तर देताना हे ट्विट करण्यात आले आहे.