नाशिक : साधुग्राममधील स्वच्छतेचा ठेका स्थायी समितीने ज्या कंपनीला देण्याचा घाट घातला आहे ती क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी राष्ट्रवादीचे मुंबईतील नेते आणि म्हाडाचे माजी चेअरमन प्रसाद लाड यांची असून, सदर ठेका राष्ट्रवादीच्या नेत्याला मिळावा यासाठीच भुजबळफार्मवरुन सूत्रे हलविली जाऊन शहराला वेठीस धरण्याचा प्रकार चालविला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख व महापालिकेतील गटनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना केला आहे.साधुग्राम स्वच्छतेच्या ठेक्याचे प्रकरण न्यायालयात जाऊन पोहोचले असतानाच अजय बोरस्ते यांनी या प्रकरणाबाबत पोलखोल करत सांगितले, स्थायी समितीने द्वितीय न्यूनतम निविदाधारक क्रिस्टल इंटिगे्रटेड या कंपनीला ठेका देण्याचे आदेश काढले आहेत. सदर कंपनी ही राष्ट्रवादीच्या नेत्याची आहे आणि याच कंपनीकडे भुजबळ फार्म, मेट, राष्ट्रवादीचे कार्यालय यांच्या देखभालीचे काम आहे. महापालिकेतील मनसेच्या सत्तेच्या दोर्या भुजबळ फार्मच्या हाती आहे. मुळात प्रथम न्यूनतम निविदादर भरणार्या वॉटर ग्रेस प्रॉडक्टस् या कंपनीवर जर थकबाकी असेल आणि तो काळ्या यादीत असेल तर पूर्व पात्रता फेरीतच आयुक्तांनी त्याला बाद ठरवायला हवे होते. आयुक्तांनी सदर प्रस्ताव तपासूनच स्थायीकडे पाठवायला हवा होता. परंतु या प्रकरणात प्रशासनाचीही भूमिका संशयास्पद दिसून येते. प्रशासन नेमके कोणाच्या तालावर नाचते आहे, याचा छडा लागला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीत बारकावे शोधणार्या प्रशासनाला करोडो रुपयांचा ठेका देताना त्यातील त्रुटी का लक्षात आल्या नाहीत, असा सवालही बोरस्ते यांनी केला. साधुग्रामची स्वच्छता ठेकेदारामार्फत न करता त्यासाठी महापालिकेनेच मानधनावर स्थानिक बेरोजगारांना काम द्यावे, अशी मागणीही बोरस्ते यांनी यावेळी बोलताना केली.
साधुग्राममधील स्वच्छतेचा ठेका राष्ट्रवादीच्या नेत्याला देण्याचा घाट सेना महानगरप्रमुखांचा आरोप : प्रशासनावरही संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2015 9:26 PM