नवी दिल्ली - विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी केलेल्या एका विधानानं सध्या नवीन वादाला तोंड फुटले आहे. हिंदुस्तानात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा डिएनए तपासा, सर्वांचे पूर्वंज भगवान राम, कृष्ण आणि बाबा भोलेनाथच असतील. आता एका केसावरूनही डिएनए चाचणी केली जाते. इतकेच नाही तर साध्वी प्राची यांनी मुस्लीम युवतींना हिंदू मुलांशी लग्न करण्याची ऑफरही दिली आहे.
साध्वी प्राची म्हणाल्या की, ज्या महिला भगिनी, मुली दुपारच्या ५० डिग्री तापमानातही काळ्या पोषाखात असतात त्यांना माझी खुली ऑफर आहे. त्या मुलींनी हिंदू मुलांशी लग्न करावं त्याचे अनेक फायदे आहेत. ते त्यांचे आयुष्य आनंदाने जगू शकतात. त्यांना काळ्या पोषाखात फिरण्याची आवश्यकता भासणार नाही. त्याचसोबत तीन तलाक, हलालासारख्या गोष्टींचाही त्रास सहन करावा लागणार नाही असं त्यांनी सांगितले.
बागेश्वरबाबाच्या विधानाचं समर्थन काही दिवसांपूर्वी बागेश्वरबाबाने साईबाबा देव नाहीत असं म्हटलं होतं. त्यावर समर्थन करताना साध्वी प्राची म्हणाल्या की, धीरेंद्र शास्त्री यांनी जे साईबाबांबद्दल विधान केले ते योग्य आणि बरोबर आहे. साईबाबा पीर फकीर, संत असू शकतात पण देव नाहीत असं विधान बागेश्वरबाबाने केले होते.
बंगालमध्ये मुस्लिमांचे लांगुनचालनरामनवमीला बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारावर त्याठिकाणी मुस्लीम उदात्तीकरण केले जात आहे. बंगालमध्ये जी परिस्थिती आहे. त्याठिकाणी स्थानिक लोक स्वत:ला असुरक्षित समजत आहेत अशी प्रतिक्रिया साध्वी प्राची यांनी दिली.
इतकेच नाही तर बिहारमध्ये हिंसा होत असताना तेथील मुख्यमंत्री नीतीश कुमार इफ्तार पार्टीत खजूर खात होते. बिहार, पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी. नेहमी हिंदू लोकांवरच बंगालमध्ये दगडफेक होतात. इतर धर्मीयांच्या लोकांवर दगडफेक केली जात नाही असा आरोपही साध्वी प्राची यांनी लावला.