भोपाळ - शहीद हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी महिलांच्या बुरखाबंदीला सहमती दर्शवली आहे. शिवसेनेच्या सामना वृत्तपत्राच्या संपादकीयमधून लिहिलेल्या अग्रलेखावरही प्रज्ञासिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना अग्रलेखाला सहमती दर्शवत देशात बुरखाबंदी व्हायला हवी, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले आहे.
श्रीलंकेप्रमाणे हिंदुस्थानातही ‘बुरखा’ तसेच ‘नकाब’वर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील आजच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. याबाबत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच साकडे घातले आहे. त्यानंतर देशभरातून विरोध होताना दिसून येत आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्यावर चांगलेच नाराज असल्याची माहिती पुढे आली आहे. तर, शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातील भूमिका शिवसेनेची अधिकृत भूमिका नसल्याचे शिवसेना प्रवक्ते निलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, साध्वी प्रज्ञा सिंग यांनी शिवसेनेच्या अग्रलेखातील भूमिका योग्यच असल्याचं म्हटलं आहे.
देशाची सुरक्षा सर्वात महत्त्वाची असून बुरख्यावर बंदी घालायलाच हवी. मुस्लीमधर्मियांनी आपण ज्या देशात राहतो, त्यानुसार परंपरांचे पालन करायला हवे, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. पहिले प्राधान्य हे देशालाच द्यायला हवे, असेही प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या आहेत. दरम्यान, साध्वींच्या वक्तव्यावर भोपाळचे काझी मौलाना सय्यद मुश्ताक अली नडवी यांनी प्रतिक्रिया दिली. बुरखा हे मुस्लीम महिलांच्या सन्मानाचं प्रतीक आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना भोपाळमधून भाजपाने लोकसभेची उमेदवारी दिली असून मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्या आरोपी आहेत. सध्या, त्यांना जामीन मिळाल्यामुळे त्या तुरुंगातून बाहेर आहेत.