बिलाईगड : मुंबई हल्ल्यातील शहीद एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारी आणि मालेगाव बॉम्बहल्ल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेंद्रसिंह बघेल यांनी गंभीर आरोप केले आहेत. साध्वीने छत्तीसगडमध्ये एकावर चाकूने हल्ला केला होता, तर गाडीवरून हाणामारीही केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भाजपाने अशा लोकांना उमेदवारी दिली आहे, जी देशासाठी शहीद झालेल्या आणि देशाने मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित केलेले हेमंत करकरेंना शाप देऊन मारल्याचे म्हणते. भाजपाने एका दहशतवादी महिलेला उमेदवारी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी याबाबत देशाची माफी मागायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. छत्तीसगडच्या बिलाईगडमधील टुंड्रायेथील प्रचारसभेत त्यांनी हा आरोप केला.
साध्वी प्रज्ञा सिंहला छत्तीसगडशिवाय कोण जास्त ओळखू शकेल. इथे ती तिच्या बहीनीच्या नवऱ्यासोबत राहत होती. एका क्षुल्लक कारणावरून तिने शैलेंद्र देवांगन याला चाकू मारला होता. तेथे असलेल्या लोकांनी हस्तक्षेप केला अन्यथा शैलेंद्रचा जीव गेला असता. कवर्धामध्येही तिने गाडीवरून मारहाण केली होती. असे उमेदवार देऊन भाजपा कोणता चेहरा दाखवू पाहत आहे. भाजपाला योग्य उमेदवार मिळत नाहीत यामुळेच ते दहशतवादी कारवायांमध्ये असलेले उमेदवार उभे करत आहे.
शहीदांविरोधात वक्तव्य करून त्यांनी काय साध्य केले. करकरे यांची हत्या दहशतवाद्यांनी केली. या लोकांचे दहशतवाद्यांशी संबंध आहेत, आणि हे आमच्यावर संबंध असल्याचे आरोप करतात. मोदी, शाह यांना माफी मागावी लागेल, असा आरोप त्यांनी केला.