भोपाळ : मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.
भाजपाकडून मध्यप्रदेशातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळ मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. तर गुना मतदार संघातून डॉ. के. पी. यादव, सागर मतदार संघातून राज बहादूनर सिंह आणि विदिशा मतदार संघातून रमाकांत भार्गव यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी भाजपात प्रवेश केला. यानंतर भोपाळमधील भाजपा कार्यालयात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी भाजपा नेता प्रभात झा आणि रामलाल सुद्धा उपस्थित होते.
भाजपाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी निवडणूक लढण्यास तयार असून या कामाला सुरुवात केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, भाजपामध्ये सकाळी सामील झाल्यानंतर भोपाळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असल्याचे वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. तसेच, त्यांनी काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते.
भोपाळ मतदार संघ भाजपाचा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार आलोक सांजर यांनी 7.14 लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी झाले होते. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार पी.सी.शर्मा यांनी 3.43 लाख मतं मिळाली होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडून भोपाळ मतदार संघातून दिग्विजय सिंह यांनी मैदानात उतरविण्यात आले आहे. तर, भाजपाकडून अद्याप या मतदारसंघासाठी कोणताही उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. यासाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. तसेच, या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे.