‘कमी प्रमाणात मद्यपान हे औषधासमान, तर अधिक पिणे विषासमान’, साध्वी प्रज्ञा सिंह यांचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 07:24 PM2022-01-21T19:24:15+5:302022-01-21T19:25:02+5:30
Sadhvi Pragya Singh: भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मद्यपानाबाबत दिलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
भोपाळ - भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मद्यपानाबाबत दिलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. नव्या मद्य धोरणाबाबत काँग्रेसकडून होत असलेल्या विरोधादरम्यान भोपाळमधील खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दारू ही स्वस्त असो वा महाग कमी मात्रेमध्ये सेवन केल्यास ती औषधासमान असते. मात्र अधिक प्रमाणात मद्यपान करणे हे विषासमान ठरते, असे विधान केले आहे.
प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या की, आयुर्वेदानुसार मद्य म्हणजेच अल्कोहोल याचे मर्यादित प्रमाणातील सेवन हे औषधाचे काम करते. मात्र दारूचे मोठ्या प्रमाणावरील सेवन हे विषासारखे ठरते. प्रज्ञासिंह ठाकूर ह्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. तिथे त्यांनी हे विधान केले.
दरम्यान, प्रज्ञासिंह यांच्या या विधानावरून काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलुजा म्हणाले की, भोपाळमधील भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या मते मर्यादित प्रमाणात मद्यपान हे नुकसानकारक नसल्याचे म्हणत आहेत. खासदार महोदया ह्या मद्याला नाही तर त्याच्या प्रमाणाला विरोध करत आहेत, हे सगळ्यांनी समजून घेतले पाहिजे, असा टोला लगावला आहे.
दरम्यान, स्वत:ला आजारी म्हणवणाऱ्या भोपाळमधील खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना देशी मदिरा नावाचं औषध देण्याची तयारी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली आहे. या औषधामुळे प्रज्ञा सिंह ठाकूर यांची प्रकृती ठीक होईल. तसेच त्यांचे मानसिक संतुलन व्यवस्थित राहावे, यासाठी त्यांना हे औषध दिले जाईल, असा दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. मध्य प्रदेश सरकारने नवे मद्य धोरण जाहीर केले आहे. त्याच्या समर्थनार्थ भोपाळमधील खासदार असलेल्या प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी विधान केल्याने त्यावरून काँग्रेसने भाजपाची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे.