सोनिया गांधी तर ‘इटली वाली बाई, सूरतमधील रोड शोदरम्यान साध्वी प्रज्ञा यांचा काँग्रेसवर घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2018 07:55 AM2018-04-26T07:55:12+5:302018-04-26T07:55:12+5:30
मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात जामिनावर सुटलेली साध्वी प्रज्ञा ठाकूरने मंगळवारी सूरतमध्ये रोड शो केला.
सूरत- मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणात जामिनावर सुटलेली साध्वी प्रज्ञा ठाकूरने मंगळवारी सूरतमध्ये रोड शो केला. यादरम्यान साध्वी प्रज्ञा यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली. 'हिंदू धार्मिक नेत्यांना कुठल्याही गुन्ह्याशिवाय तुरुंगात डामलं जात असल्याचा आरोप साध्वी प्रज्ञा यांनी केला. देशभर फिरून काँग्रेसचं लोकांचं विभाजन करणाऱ्या विचारांविरोधात उभं राहणार असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. 'एक महिला सत्तेत असताना संतांना तुरुंगात राहून यातना सहना कराव्या लागल्या. याचं कारण म्हणजे ती महिला इटलीतून आली होती, अशी टीका साध्वी प्रज्ञा यांनी केली. त्यानंतर आपल्या भाषणात साध्वी प्रज्ञा यांनी अनेकदा इटलीतून आलेल्या बाईचा उल्लेख करत सोनिया गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली.
मालेगाव बॉम्ब स्फोटाचा आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञाने अनेक वर्ष तुरुंगात घालवली आहेत. मंगळवारी सूरतमध्ये आयोजीत सभेच्या वेळी हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी साध्वी प्रज्ञाचं जोरदार स्वागत केलं.
दरम्यान, सोमवारी (ता. 23 एप्रिल) साध्वी प्रज्ञाने कथुआ प्रकरणावरही वादग्रस्त विधान केलं होतं. आठ वर्षाच्या मुलीची फक्त हत्या झाली. त्याला बलात्काराचं वळण देऊन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नका. या देशात हिंदू व हिंदुत्वाची बदनामी करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे, असं त्यांनी म्हटलं.