ऑनलाइन लोकमत
वाराणसी, दि. २३ - विदेशी महिलांनी आखूड कपडे घालून मंदीरात आल्यास व्यवस्थापनाने दिलेली साडी नेसून दर्शनासाठी जावे असा नियम काशी विश्वनाथ मंदीराने केल्याचे वृत्त बीबीसीने दिले आहे. मंदीराने साडी व धोतर देणारा एक काउंटर उघडला आहे. देवस्थानच्या परीसरात एक किमान साधेपणा रहावा या हेतूने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. विदेशी महिला अत्यंत आखूड कपड्यात येत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया मंदीराचे सीईओ पी. एन. द्विवेदी यांनी दिली आहे.
अंगप्रदर्शन करणारे कपडे मंदीरात येताना असू नयेत हा उद्देश असल्याचे सांगताना मंदीर देत असलेली साडी वा धोतर आहे त्या कपड्यांवर गुंडाळावे व दर्शनास जावे अशी अपेक्षा असून यासाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येत नसल्याचेही द्विवेदी म्हणाले. जर भारतीय व्यक्ती अंगप्रदर्शन करणा-या पेहरावात आली तर त्यांनाही ही सुविधा पुरवली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.
आम्ही कुठल्याही विदेशी महिलांना दर्शनापासून मज्जाव केलेला नाही, आणि आम्ही कुठल्याही ड्रेसकोडची जबरदस्तीही करत नाही असंही मंदीरानेस्पष्ट केलं आहे.
विशेष म्हणजे बीबीसीने विदेशी पर्यटकांना याबाबत विचारलं असता, त्यांनी साडी गुंडाळून जाण्यास काहीच हरकत नसल्याची भावना व्यक्त केली आहे.