नवी दिल्ली : कमला अडवाणी यांच्या निधनाचे वृत्त येताच सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दु:ख व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकसंदेशात म्हटले की, कमला अडवाणी या नेहमीच पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या राजकीय जीवनात त्यांनी केवळ साथच दिली नाही, तर त्या त्यांच्यामागे ठामपणे उभ्या राहिल्या. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लालकृष्ण अडवाणी यांना शोकसंदेश पाठवला असून, तुमच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे त्यात नमूद केले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही लालकृष्ण अडवाणी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आपण सहभागी आहोत, असे म्हटले आहे.समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनीही शोक व्यक्त केला असून, हे दु:ख सहन करण्याची ताकद ईश्वर आपणास देवो, असा संदेश त्यांनी पाठवला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शाह केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, नितीन गडकरी, रवी शंकर प्रसाद, जे. पी. नड्डा, प्रकाश जावडेकर, सदानंद गौडा, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा अनेक नेत्यांनी कमला अडवाणी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
कमला अडवाणी यांच्या निधनाने दु:ख
By admin | Published: April 06, 2016 10:18 PM