रायपूर : छत्तीसगढच्या जंगलात दूरदर्शनचे कॅमेरामन अच्युतानंद साहू यांची हत्या केल्यानंतर त्यांच्याशी वा पत्रकारांशी आपले अजिबात वैर नसून, सुरक्षा दलाच्या जवानांसह ते आले, तर ते मारले जाऊ शकतील, असा इशारा नक्षलवाद्यांनी शुक्रवारी दिला.नक्षलवाद्यांनी एक पत्र प्रसिद्धीस दिले असून, त्यात आमचे पत्रकारांशी काहीच वैर नाही, असे स्पष्ट केले आहे. सुरक्षा दलाच्या जवानांसह कॅमेऱ्यासह आलेले लोक हे पत्रकारांच्या तुकडीचा भाग आहेत, हे आम्हाला माहीत नव्हते. ते सुरक्षा दलाचाच भाग असल्याचे वाटल्यामुळेच त्यांची हत्या झाली, असे त्यात म्हटले आहे. अच्युतानंद साहू ज्या ठिकाणी बसले होते, ते पाहून आम्हाला ते पत्रकार आहेत, हे समजले नाही. ते जवानच आहेत, असे आम्हाला वाटले. त्यामुळे त्यांची हत्या झाली असे नमूद करतानाच, त्यांच्या मृत्यूबद्दल नक्षलवाद्यांनी दु:खही व्यक्त केले आहे. तसेच यापुढे पत्रकारांनी वा त्यांच्या तुकडीने सुरक्षा दलाच्या जवानांसह येऊ नये, असा इशाराही या पत्रात देण्यात आला आहे. तुम्ही एकटे आलात, तर तुमचे इथे स्वागतच केले जाईल, असे त्यांनी म्हटले. बिजापूर जिल्ह्यातील चकमकीत नक्षलवादी ठारबिजापूर जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवादी यांच्यात उडालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. त्याच्याकडील रायफल जप्त करण्यात आली आहे. तेथील जंगलात अद्याप चकमक सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याआधी चकमकीत दोन जवानही जखमी झाले आहेत.
म्हणे आम्हाला त्या हत्येचं दु:ख; नक्षलवाद्यांनी जारी केलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 5:47 AM