ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - नरसंहार आणि क्रूरकृत्यांनी जगभरात दहशत निर्माण करणा-या इसिस या दहशतवादी संघटनेने बँकेतील कर्ज, अपहरण, सोशल मीडियाच्या माध्यमातून निधी जमा केल्याची माहिती समोर आली आहे.
पॅरिस हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वी फ्रान्समध्ये आर्थिक कारवाई कार्यबलाची (फायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स - एफएटीएफ) बैठक पार पडली. एफएटीएफमध्ये भारतासोबतच अमेरिका, रशिया, फ्रान्स आदी देशांचाही समावेश आहे. या बैठकीत इसिसच्या आर्थिक स्त्रोतांविषयी माहिती देण्यात आली आहे. इसिसने बँकेतून शॉर्ट टर्म लोन (कर्ज) घेतले असून पैसे परत न करण्याच्या उद्देशानेच हे कर्ज घेतले जात आहेत असे या ५० पानी अहवालात म्हटले आहे. अशा प्रकारच्या आर्थिक पाठबळावर लगाम लावण्यासाठी नवीन कायद्याची गरज आहे असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सोशल नेटवर्किंग साईट हा इसिसच्या उत्पन्नाचा एक प्रमुख मार्ग आहे. यात ट्विटर किंवा विशिष्ट थीम असलेल्या वेबसाईटवर आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात येते. 'सुरुवातीला ट्विटरवर मदत मागितले जाते, यानंतर मदत करण्यास तयार असलेल्यांना स्काईपव्दारे संपर्क करण्यास सांगितले जाते. स्काईपवर या मंडळींना प्रीपेड कार्डचा नंबर दिला जातो. पैसे गोळा करणारा व्यक्ती या कार्डचा नंबर सीरियालगतच्या देशांमधील हस्तकांना देतो. ही मंडळी हा प्रीपेड कार्ड कमी किंमतीमध्ये विकतात व त्यातून मिळणारे पैसे इसिसच्या खात्यात जमा होता' असे दावा अहवालात करण्यात आला आहे.
एफएटीएफमध्ये भारतानेही २६/११ च्या हल्ल्यात कशा पद्धतीने आर्थिक मदत झाली होती याविषयीची माहिती सादर केली. या हल्ल्यात बनावट नोटांचा वापर झाला होता असे भारताने म्हटले आहे.