लोकमत न्यूज नेटवर्क हैदराबाद : भारत बायोटेकने विकसित केलेल्या ‘कोवॅक्सिन’ लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण होण्याआधीच तिच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिल्याने भारत बायोटेक कंपनी टीकेची धनी ठरली. मात्र, आमची लस सुरक्षित असून, लहान मुलांनाही ती दिली जाऊ शकते, असा दावा कंपनीचे प्रमुख डॉ. कृष्णा इल्ला यांनी केला आहे. आपल्या सहा वर्षांच्या नातवालासुद्धा ही लस देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे.
कोवॅक्सिन लसीला मान्यता दिल्याने अनेकांनी टीकेचे आसूड ओढले. मात्र, डॉ. इल्ला यांनी लस सुरक्षित असल्याचा दावा केला होता. आताही त्यांनी लहान मुलांमध्ये ही लस सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. २ ते १२ या वयोगटांतील मुलांना ही लस दिली जाऊ शकते, असेही त्यांनी ठामपणे सांगितले आहे. लसीची दोन वर्षांखालील मुलांवर लवकरच चाचणी करण्याची योजना असून, औषधी नियंत्रकांना याबाबत प्रस्ताव देण्यात येणार आहे.