अहमदाबाद - लोखंडी खिळे, यू-पिन, सेफ्टी पिन, हेयर पिन, ब्रेसलेट, चैन, मंगळसुत्र, कॉपर रिंग आणि बांगड्या या गोष्टी प्रामुख्याने दुकानात उपलब्ध असतात. मात्र एखाद्या महिलेच्या पोटातून अशाप्रकारचं सामान बाहेर काढण्यात आल्याचं सांगितलं. तर सुरुवातीला कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. अहमदाबादच्या एका सरकारी रुग्णालयामध्ये एका महिलेच्या पोटातून लोखंडाच्या काही वस्तू बाहेर काढण्यात आल्या आहेत.
संगीता असं या महिलेचं नाव असून पोट दुखीच्या तक्रारीसाठी तिला 31 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केल्यानंतर तिच्या पोटातून दीड किलोच्या वस्तू काढण्यात आल्या. संगीता महाराष्ट्रातील शिर्डीची रहिवाशी असून मानसिक रुग्ण आहे. अहमदाबादच्या शाहरकोटडा परिसरात संगीता पोलिसांना फिरताना दिसली. कोर्टाच्या आदेशानंतर तिला मानसिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र पोटात दुखत असल्याने उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर महिलेचे एक्सरे काढले. त्यामध्ये त्यांना काही धक्कादायक गोष्टी दिसून आल्या. त्यामुळे डॉक्टरांनी या महिलेवर तातडीनं शस्त्रक्रिया केली असता तिच्या पोटातील लोखंडाच्या वस्तू बाहेर काढल्या आहेत. डॉ. परमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'या महिलेला 'एकुफेगिया' हा मानसिक आजार आहे. हा आजार असलेला व्यक्ती अशा विचित्र वस्तू गिळतात. परंतु अत्यंत दुर्मिळ असा हा आजार असल्यानं याचे रुग्ण क्वचितच आढळतात'.