संसदेत घुसखोरी करणाऱ्या लखनौच्या सागर शर्माची सध्या चौकशी सुरू आहे. काल दिल्लीहून आलेल्या स्पेशल सेल टीमने सागर शर्माला त्याच्या कुटुंबीयांशी व्हिडीओ कॉलवर बोलायला दिलं असं सांगितलं जात आहे. हा संवाद सुमारे 40 मिनिटं चालला. याच दरम्यान सागरने कुटुंबीयांना सांगितलं की, आपण जे काही केलं ते योग्यच आहे. सागरने कॉलवर आईला घरी सर्व ठीक आहे का, काही अडचण आहे का? असं विचारलं.
यावर आई, बेटा तू हे काय केलंस? असं म्हणाली. तेव्हा त्याने जे केलं ते बरोबर आहे. मी योग्य तेच केलं. मी ते कोणाच्या सांगण्यावरून केलेलं नाही. चौकशीनंतर मला लवकरच सोडण्यात येईल. आई तू तूझी आणि माहीची काळजी घे असं म्हटलं. संवादादरम्यान सागर शर्माने लखनौ आणि इतर काही ठिकाणच्या त्याच्या घराबाबत महत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती दिली.
दिल्लीतील स्पेशल सेल टीमला सागरच्या खोलीतून 4 बँक खात्यांची पासबुक सापडली आहेत. या व्यवहाराची चौकशी करण्यात येत आहे. या खात्यांमध्ये कधी, कुठे आणि किती पैशांची देवाणघेवाण झाली, याची माहिती गोळा केली जात आहे. याशिवाय खोलीत पॉकेट डायरी, पुस्तकं, फाइल्स, तिकीट असं साहित्य सापडलं. सागरच्या वडिलांच्या सहीनंतर ते जप्त करण्यात आले आहेत. तपास यंत्रणेने आरोपी सागर शर्माचे आई-वडील आणि बहिणीला एकत्र बसवून चौकशी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, यूपी एटीएस आणि इंटेलिजन्सची टीमही सागरच्या लखनौच्या घरी पोहोचली आहे आणि त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे. आरोपी सागर शर्मा याला बॅटरी रिक्षा देणारे ननके आणि त्याचा मुलगा हिमांशू यांचीही पथकाने चौकशी केली आहे. ज्यामध्ये सागरने बँकांशी संपर्क साधल्याचं समोर आले आहे. त्यांनी निधी उभारण्याचा प्रयत्न केला. त्याला स्वतःची नवीन ई-रिक्षा घ्यायची होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी ही टीम सागरच्या घरी पोहोचली होती. या टीममध्ये सहा सदस्यांचा समावेश होता. सर्वजण साध्या वेशात होते. घरात बसलेल्या इतर लोकांना बाहेर काढल्यानंतर सागरची आई, वडील आणि बहिणीची बंद खोलीत सुमारे 40 मिनिटे चौकशी करण्यात आली. यादरम्यान सागरने आई-वडील आणि बहिणीसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.