ऑनलाइन लोकमत
सहारनपूर, दि. 08 - उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यात उसळलेल्या जातीय हिंसाचार प्रकरणी भीम सेनेचा प्रमुख चंद्रशेखर आझाद ऊर्फ रावण याला पोलिसांनी अटक केली आहे.
भीम सेनेचा प्रमुख चंद्रशेखर आझाद याच्याविरोधात अटक वारंट जारी करण्यात आले होते. तसेच, त्याची माहिती देणा-याला बारा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्याला पोलिसांनी हिमालच प्रदेशातील डलहौजी येथील सुभाष चौकातून सकाळी साडे दहाच्या सुमारास अटक केली.
सहारनपूर जिल्ह्यात जातीय हिंसाचार उसळल्यानंतर चंद्रशेखर आझाद याने सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून भडकाऊ भाषण दिले होते. त्यानंतर सहारनपूरचे पोलीस महासंचालक सुनील इमेनुएल यांनी चंद्रशेखर आझाद आणि त्याच्या तीन साथीदारांची माहिती देणा-याला बारा हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. दरम्यान, पोलिसांनी बुधवारी दोन साथीदारांना अटक केली आहे. त्यानंतर आज चंद्रशेखर आझाद याला अटक केली.
वरिष्ठ पोलीस अधिक्षक बबलू कुमार यांनी सांगितले की, 5 मे रोजीच्या हिंसेनंतर भीमसेनेने 5 मे रोजी सहारनपूरमधील हिंसेविरोधात आंदोलन केले. यावेळी पोलीस स्टेशनवर भीम सेनेकडून दगडफेक आणि पोलीस चौकीची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी दीपक आणि प्रवीण गौतम यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांची चौकशी सुरु आहे. त्याचबरोबर यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरु असल्याचेही ते म्हणाले.
पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहारनपूर जातीय हिंसेंदरम्यान भीम सेनेच्या अकाऊन्टमध्ये जवळपास 45 ते 50 लाख रुपये ट्रान्सफर झाले होते. याप्रकरणी सुद्धा पोलीस तपास करत आहेत.
Main accused in #Saharanpur violence, Bhim Army chief Chandrashekhar arrested by UP STF from Himachal Pradesh"s Dalhousie.— ANI UP (@ANINewsUP) June 8, 2017