कोरोनाच्या संकटात अनेकांचे मोठे नुकसान झाले. लॉकडाऊनमध्ये लाखो लोक बेरोजगार झाले. काहींनी हार मानली तर काही जण जिद्दीने उभे राहिले. काहींनी आपल्या कौशल्याला आपली ताकद बनवली. यामुळे आज ते चांगले कमावत आहेतच, शिवाय काही लोकांना आपल्यासोबत जोडून रोजगारही देत आहेत. अशीच प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. सहरसा जिल्ह्यातील निशा कुमारी यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. .
कोरोनाच्या काळात निशा यांच्या पतीची नोकरी गेली. त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. मात्र कठीण परिस्थितीत खचून जाण्याऐवजी त्यांनी वेगळा मार्ग निवडला. मिळालेल्या माहितीनुसार, सहरसा जिल्ह्यातील सत्तारकटैया ब्लॉकमधील बरहशेर पंचायतीच्या गंडोल येथील रहिवासी असलेल्या निशा कुमारी यांच्यासाठी मुख्यमंत्री महिला उद्योजिका योजना वरदान ठरली आहे. या योजनेतून निशा यांनी 10 लाखांचे कर्ज घेतले.
कर्ज घेतल्यानंतर त्यांनी तेजस बेसन-सत्तू नावाचा उद्योग सुरू केला. या पैशातून त्यांनी महाराष्ट्र, रांची आणि बिहारच्या इतर जिल्ह्यांमधून सहा लाखांचे मशीन खरेदी केले. 26 जानेवारीला हा उद्योग सुरू झाला. या उद्योगात त्या बेसन बनवतात. आता निशा यांनी 4 ते 5 जणांना रोजगारही दिला आहे. निशा सांगतात की, त्यांच्या इथे चांगल्या प्रतीचे बेसन तयार केले जाते. ते तयार केल्यानंतर जिल्ह्यातील छोट्या दुकानदारांना त्याचा पुरवठा केला जातो.
इतर राज्यांतूनही बेसनला मागणी येऊ लागली आहे. निशा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व खर्चात कपात करून त्या महिन्याला 20 ते 25 हजार रुपये वाचवतात. त्यांच्या उद्योगातून तयार केलेलं बेसन बाजारात 100 रुपये किलो दराने पाठवलं जातं. अनेक महिलांसाठी निशा प्रेरणादायी ठरत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.