जयपूर - राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकांचा जोर वाढला आहे. त्यामुळे नेते अन् कार्यकर्त्यांसह सरकारी अधिकारीही कामात व्यस्त झाले आहेत. तर पोलीस प्रशासनानेही कंबर कसली आहे. मात्र, या निवडणूक कर्तव्यावर असलेल्या एका फिजीकल ट्रेनिंग इंस्ट्रक्चरला सुट्टी हवीय. विशेष म्हणजे नुकतेच लग्न झालेल्या या इंस्ट्रक्चरने हनीमूनला जाण्यासाठी सुट्टी मिळावी म्हणून अर्ज केला. त्यानंतर, अधिकाऱ्यांनीही त्याची सुट्टी मंजूर केली आहे.
राजस्थानमधील चेरू येथे निवडणूक कर्तव्यावरील फिजीकल ट्रेनिंग इंस्ट्रक्चर राजदीप लांबा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना एक पत्र लिहिले. त्यामध्ये, कृपया मला सुट्टी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. नुकतेच माझं लग्न झालं असून मला हनीमूनला जाण्यासाठी सुट्टी मिळावी असे या अर्जात लांबा यांनी नमूद केलं आहे. त्यावर, अधिकाऱ्यांनीही वास्तविक कारण असल्याचे समजून घेत त्यास रजा मंजूर केली. राजदीप यांची ड्युटी चेरू जिल्ह्यातील झरिया या गावीतील सरकारी शाळेत आहे. मात्र, नवीन लग्न झाले असल्यामुळे 29 नोव्हेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत मला हनीमूनसाठी सुट्टी देण्यात यावी अशी विनंती राजदीप यांनी निवडणूक अधिकारी मुक्तानंद अग्रवाल यांच्याकडे केली होती. त्यानंतर, अग्रवाल यांनी राजदीप यांच्या लग्नाची तारीख, हॉटेलचे बुकींग आणि विमानाचे बुकींग यांची खात्री करुन त्यांस सुट्टी मंजूर केली.
विशेष म्हणजे माझं लग्न निवडणूक तारखा जाहीर होण्यापूर्वीच ठरलं होतं. त्यानंतर मी हनीमूनसाठीचं वेळापत्रक ठरवलं होत. त्यामुळे मी त्या वेळापत्रकातमध्ये बदल करु शकत नाही, अशी विनंती राजदीप यांनी केली होती. दरम्यान, 11 डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये निवडणुकांसाठी मतदान होणार असून त्यादिवशी हे कपल दिल्लीत असणार आहे.