बरेली - मला पैसे नकोत, नोकरीही नको, सगळं काही वापस घ्या. पण, माझा पती मला परत द्या. पतीच्या निधनानंतर अश्रूंचा बांध फुटलेल्या रजविंदर कौर यांचे हे शब्द ऐकून अनेकांचे डोळे पाणावले. या परिस्थितीत रजविंदर यांना सांभाळणं कठीण बनलं होतं. कारण, आपला पती आपल्याला सोडून गेल्याचं वास्तव पचवणं त्यांना शक्य नव्हतं. तर, दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी सारजसिंग यांच्याघरी भेट दिली. त्यावेळी, आईंच्या डोळ्यातील अश्रू पाहून कलेक्टर साहेबही भावूक झाले होते.
जम्मूच्या राजौरी जिल्ह्यातील पूँछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवानांना वीरमरण प्राप्त झाले. सारजसिंग हे 16 आर.आर राष्ट्रीय रायफल्समध्ये सहभागी होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर गावात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी त्यांच्या मूळगावी गर्दी केली आहे. सारजसिंग यांची पत्नी रजविंदरसिंग मंगळवारी दुपारी जवळपास 12.30 वाजता आपल्या आई-वडिलांसह सासरी पोहोचली. कारमधून उतरताच घरात शिरल्यानंतर खाटावर बसलेल्या सासूच्या गळ्यात पडून ती मोठमोठ्यानं रडू लागली. सुनेची ही दशा पाहून सासू परमजीत कौर यांनाही अश्रू अनावर झाले. पण, त्यांनी स्वत:ला सावरले. सुनेची समजूत काढत, मुली मीही माझा मुलगा हरवलाय, स्वत:ला सांभाळ असे म्हणत परमजीत यांनीच आपल्या सुनेला धीर दिला. मात्र, पतीच्या निधनाचा मोठा धक्का रजविंदर हिला बसला होता. त्यामुळेच, ती रडता रडता बेशुद्ध पडली.
रजविंदरची आई कुलवीर कौर यांनी सांगितले की, पती सारजच्या निधनाची बातमी ऐकल्यापासून रजविंदरच्या वेदना असह्य झाल्या आहेत. दु:खाचा डोंगरच तिच्यावर कोसळला आहे, त्यामुळे ती सातत्याने बेशुद्ध पडत आहे, अनेकदा तोंडावर पाणी मारून तिला जागं केलंय. पती ज्याठिकाणी तैनात होते, तेथे कमी प्रमाणातच फोनवरुन संवाद व्हायचा. तेथील परिस्थिती खराब असल्याची जाणीव रजविंदरला व्हायची. पण, पतीने सर्वकाही ठिक असल्याचं सांगितलं होतं. रविवारी शेटवचं बोलणं पती सारजसोबत झालं होतं. त्यावेळी, डिसेंबर महिन्यात मेव्हण्याचा लग्नाला कुठल्याही परिस्थितीत सुट्टी घेऊन येणार असल्याचं पतीन म्हटलं होतं. पण, आता ते कधीच येणार नाहीत, या वास्तवाने ती पूर्णत: कोलमडली आहे.