नवी दिल्ली : साहित्य अकादमीचे २०२२ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा साहित्य पुरस्कारासाठी मराठी व कोकणी या दोन्ही भाषांतील कादंबऱ्यांची निवड करण्यात आली आहे. मराठीत 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' या कादंबरीसाठी प्रवीण दशरथ बांदेकर यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कोकणीसाठी माया अनिल खर्नांगटे यांच्या अमृतवेल या कादंबरीची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी १ लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरूप असून अकादमीच्या साहित्य अक्षरोत्सवात पुरस्कार प्रदान केले जातील.
याचबरोबर, 'इन गुड फेथ' या सबा नकवी लिखित इंग्रजी पुस्तकाच्या 'सलोख्याचे प्रदेश : शोध सहिष्णू भारताचा' या मराठी अनुवादासाठी प्रमोद मुजुमदार यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच, यंदा इंग्रजीसाठी अनुराधा रॉय यांच्या –आल द लाईव्हज व्हेनेव्हर लिव्हड या पुस्तकाची, तर हिंदीसाठी थुमाडी के शब्द या बद्रीनारायण यांच्या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. साहित्य अकादमीचा बंगालीसाठीचा तर कोकणी व हिंदीसह ७ भाषांसाठीचे अनुवाद पुरस्कार नंतर जाहीर केला जाईल. साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत २३ भाषांतील साहित्यकृतींना अकादमी सन्मान देण्याचा निर्णय घेण्यात आला असे अकादमीचे सचिव डॉ के श्रीनिवास राव यांनी सांगितले. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये ७ काव्यसंग्रह, ६ कादंबऱ्या, २ कथासंग्रह, ३ नाटके, २ टीकात्मक पुस्तके, प्रत्येकी १ आत्मकथन, लेखसंग्रह व एतिहासिक कथासंग्रहाची निवड करण्यात आल्याचेही डॉ के श्रीनिवास राव यांनी सांगितले. दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक भआलचंद्र नेमाडे, ज्येष्ठ संपादक व खासदार कुमार केतकर आणि प्रा. नितीन रिंढे यांच्या निवड समितीने यंदाच्या मराठी साहित्यकृतीची निवड या पुरस्कारसाठी केली.