ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि . ७ - दादरीतील घटनेच्या निषेधार्थ नयतनारा सेहगल व अशोक वाजपेयी यांनी साहित्य अकादमी पुरस्करा परत करण्याच्या प्रकारावर साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. साहित्य अकादमीसारख्या स्वायत्त संस्थेचे राजकारण करु नका असे त्यांनी म्हटले असून पुरस्कार परत केला तरी या पुरस्कारामुळे मिळालेला सन्मान व प्रतिष्ठेच काय करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
दादरीत गोमांस ठेवल्याच्या संशयावरुन जमावाने एका मुस्लिम व्यक्तीची हत्या केली होती. या घटनेनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि जगण्याच्या अधिकार हे दोन मुलभूत हक्कांची पायमल्ली होत असल्याची टीका करत मंगळवारी नयनतारा सेहगल तर बुधवारी अशोक वाजपेयी यांनी साहित्य अकादमी पुरस्कार केला आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य अकादमीचे प्रमुख विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. तिवारी म्हणाले, साहित्य अकादमी ही सरकारी संस्था नसून ही एक स्वायत्त संस्था आहे. लेखकाला त्याच्या एका ठराविक कामासाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार पद्म पुरस्कारासारखा नसल्याने तो पुरस्कार परत करण्यात काहीच अर्थ नाही असे तिवारींनी नमूद केले.
साहित्य अकादमी गेल्या ६० वर्षांपासून अधिक काळ कार्यरत आहे. साहित्य क्षेत्राला पुढे नेणे हीच अकादमीची मुख्य भूमिका आहे. इमर्जन्सीच्या काळातही अकादमीने कोणतीही भूमिका घेतली नव्हती अशी आठवणही त्यांनी करुन दिली. लेखक हे अकादमीचा नव्हे तर सरकारचा विरोध करत आहे, त्यामुळे त्यांनी पुरस्कार परत करण्याऐवजी अन्य मार्गांनी विरोध दर्शवला पाहिजे असे तिवारी यांनी स्पष्ट केले.