ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 25 - साईबाबा यांना देवाचा दर्जा द्यावा की नाही यावरून देशातील धर्मपंडितांमध्ये मतभेद असतानाच आता या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही उडी घेतली आहे. प्रत्येक माणसामध्ये देव असतो असे हिंदू तत्त्वज्ञान मानते आणि या तत्त्वज्ञानानुसार साईबाबा हे देवच आहेत, असे संघाने म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत भैयाजी जोशी यांनी ही भूमिका मांडली आहे. संघाचे अखिल भारतीय महासचिव भय्याजी जोशी म्हणाले, "साईबाबांची पूजा करावी का यावरून वाद व्हावा असे संघाला वाटत नाही. प्रत्येक मानव प्राण्यामध्ये ईश्वराचा अंश असतो. तसाच तो साईबाबा यांच्यामध्येही आहे. हिंदू तत्त्वज्ञान हीच शिकवण देते. त्यामुळे साईबाबांची पूजा करणे गैर आहे असे मला वाटत नाही.त्यामुळे ज्यांची साईबाबांवर श्रद्धा आहे. असे भक्त साईबाबांची देव म्हणून पूजा करू शकतात. तसेच साईबाबांच्या नावाने मंदिरेही उभारू शकतात. त्यात वाद निर्माण करण्यासारखे काहीच नाही. " द्वारका-शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंत सरस्वती यांनी साईबाबा हे देव नसून भक्तांनी त्यांची पूजा करू नये, असे आवाहन करून वाद निर्माण केला होता.