आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या 'त्या' वक्तीला पैसे पुरवणारे कोण? : राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 11:20 AM2020-02-01T11:20:23+5:302020-02-01T11:23:40+5:30
सत्ताधारी पक्षातील मंत्री लोकांना गोळीबार करण्यास चिथावणी देत असतील, तर जामिया मिलिया परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटना शक्य आहे.
नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्मालिया विद्यापीठ परिसरात एका तरुणानं नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलकांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यात जामियाचा एक विद्यार्थी जखमी झाला असून, त्यांचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत. तर गोळीबार करणाऱ्या त्या व्यक्तीला कोणी पैसे पुरवले, असा प्रश्न काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नवी दिल्लीत सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात निदर्शने केली. यावेळी गोळीबाराच्या घटनेबद्दल पत्रकारांनी विचारले असता, जामिया मिलिया इस्मालिया विद्यापीठ परिसरात गोळीबार करणाऱ्या त्या व्यक्तीला कोणी पैसे पुरवले ? असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला.
तर, सत्ताधारी पक्षातील मंत्री लोकांना गोळीबार करण्यास चिथावणी देत असतील, तर जामिया मिलिया परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटना शक्य आहे. अशा शब्दांत काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजपला फटकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते हिंसाचारासोबत आहेत की, अहिंसेसोबत याचे उत्तर द्यावे, असेही प्रियंका गांधी म्हणाल्यात.