सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर चाकू हल्ला करणाऱ्या बांगलादेशी घुसखोरासंदर्भात सातत्याने नव-नवी माहिती समोर येत आहे. चौकशीदरम्यान, या हल्लेखोराने बांगलादेशातून भारतात कसा प्रवेश केला यासंदर्भातही माहिती दिली आहे.
सैफवर चाकू हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद असे आहे. जेव्हा पोलिसांनी त्याला पकडले तेव्हा तो भारतीय असल्याचा कोणताही पुरावा याढळून आला नाही. त्याच्याकडे सापडलेल्या मोबाईल फोनवरून तो बांगलादेशी असल्याचे उघड झाले. कारण तो बांगलादेशात राहत असलेल्या त्याच्या आई-वडिलांच्या सातत्याने संपर्कात होता. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, तो बांगलादेशातून भारतात आल्याची संपूर्ण कहाणी समोर आली.
नदी ओलांडून मेघालयात शिरला -शहजाद ऑगस्ट २०२४ मध्ये भारतात आला. त्याने बांगलादेश आणि मेघालय सीमेवरील दावकी नदी ओलांडून भारतात प्रवेश केला. यानंतर ते काही महिने पश्चिम बंगालमध्ये राहिले. तेथे त्याने एका व्यक्तीच्या आधार कार्डचा वापर करून सिम कार्ड खरेदी केले आणि आपले नाव बदलून विजय दास नावाने वावरू लागला.
पश्चिम बंगालमधून थेट मुंबई - मोहम्मद शरीफुल पश्चिम बंगालहून थेट मुंबईत आला. तो मुंबईत काम शोधत होतो. पण कागदपत्रे नसल्याने त्याला चांगले काम मिळाले नाही. यामुळे तो साफसफाई आणि मजूरीसारखी छोटी-मोठी कामे करू लागला. त्याला वरळी आणि ठाण्यातील पबमध्ये क्लिनरचे कामही मिळाले होते. मात्र तो तिथेही चोरी करताना पकडला गेला. आता त्याने बांगलादेशात परत जाण्याची योजना आखली होती, मात्र, यासाठी त्याला ५० हजार रुपयांची आवश्यकता होती. यामुळे त्याने मोठा हात मारण्याच्या इराद्यात होता.
सैफवर झाला होता जीवघेणा हल्ला - सैफ अली खानच्या घरात शिरून आरोपी चोराने त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. सैफवर सहा वेळा चाकूने वार करण्यात आले होते. त्याच्या पाठीत अडीच इंचाचा चाकूचा तुकडाही आढळला. ही घटना १६ जानेवारीला पहाटे घडली. यानंतर, चार दिवसांनी, पोलिसांनी सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला अटक केली. सध्या आरोपी १४ दिवसांच्या रिमांडवर आहे आणि पोलिस त्याची चौकशी करत आहेत.