नवी दिल्ली - भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल (Saina Nehwal) हिच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणं अभिनेता सिद्धार्थ (Siddharth) याला चांगलंच महागात पडलं. त्याच्या या ट्विटनंतर सिद्धार्थ लोकांच्या निशाण्यावर आला. सोशल मीडिया युजर्सनी सिद्धार्थवर टीकेचा भडीमार केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनीही सिद्धार्थचा तिखट शब्दात समाचार घेतला. तर, महिला आयोगानेही सिद्धार्थविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र, आता या प्रकरणावर पडदा पडल्याचे दिसून येत आहे. कारण, सिद्धार्थला सायनाने माफ केले आहे. सायनाचे वडील हरवीर सिंह नेहवाल यांनीही सिध्दार्थला फैलावर घेत, त्यानं माफी मागावी, अशी मागणी केली. सर्व बाजूंनी टीकेची झोड उठल्यानंतर अखेर सिद्धार्थने सायनाची माफी मागितली आहे. सायनाची माफी मागत, सिद्धार्थने एक खुलं पत्र लिहिलं आहे. त्यावर, सायनाने प्रतिक्रिया देत सिद्धार्थने माफी मागितल्याचा आनंद झाल्याचं म्हटलं आहे.
सायनाने ANI शी बोलताना सिद्धार्थच्या माफीनाम्यावर प्रत्युत्तर दिलंय. त्याने माझ्याबद्दल काहीतरी लिहिलं, आणि नंतर माफी मागितली. मला नाही माहिती, ते एवढं व्हायरल कसं झालं. ट्विटर ट्रेंडमध्ये माझं नाव पाहून मी आश्चर्यचकित झाले. सिद्धार्थने माफी मागितली, याचा मला आनंद झाला, असे सायनाने म्हटले. म्हणजे, सायनाने सिद्धार्थला मोठ्या मनाने माफ केले आहे.
काय आहे सिद्धार्थचं पत्र
‘प्रिय सायना, काही दिवसांपूर्वी मी तुझ्या एका ट्विटला उत्तर देताना एक उपरोधिक विनोद केला. त्यासाठी मी तुझी माफी मागू इच्छितो. माझे तुझ्याशी मतभेद असू शकतात. तुझे ट्विट वाचताना माझी नाराजी वा राग शब्दरूपात बाहेर आला. पण, म्हणून मी वापरलेल्या शब्दांचे समर्थन करू शकत नाही.
माझ्यात यापेक्षा अधिक ग्रेस आहे. त्या विनोदाबद्दल बोलायचं तर, तो काही फार चांगला नव्हता. त्या विनोदासाठी सॉरी. तो ज्या पद्धतीने पोहोचायला हवा होता तसा पोहोचला नाही. कुणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी महिलांचा नेहमीच आदर करतो. महिला म्हणून तुझ्यावर टीका करायचं म्हणून ते ट्विट नव्हतं. तू नेहमीच माझ्यासाठी चॅम्पियन असशील आणि हे मी प्रामाणिकपणे म्हणतोय. आशा करतो, माझी माफी स्वीकारून जे काही झालं ते विसरून तू पुढे जाशील...
काय आहे ट्विट प्रकरण
सायना नेहवालने नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौ-यादरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटीवरून चिंता व्यक्त केली होती. ‘जर आपल्या पंतप्रधानांच्या सुरक्षेवरच प्रश्न उपस्थित होत असतील, तर तो देश स्वत:ला सुरक्षित म्हणू शकत नाही. पंजाबमध्ये जे काही घडलं, त्याची मी कठोर शब्दांत निंदा करते,’ असे ट्विट तिने केलं होतं. सायनाच्या ट्विटवर अभिनेता सिद्धार्थने ट्विट केलं होतं. यामध्ये त्याने द्विअर्थी शब्दांचा वापर करत पुढे ‘शेम ऑन यू रिहाना’ असं लिहिलं होतं. लोकांनीही त्याच्या या ट्वीटवर आक्षेप घेतला होता. तसेच महिला आयोगानेही यासंदर्भात सिद्धार्थला नोटीस जारी केली होती.