नवी दिल्ली : साऊथचा अभिनेता सिद्धार्थ आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत आला आहे. भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालबाबत केलेल्या एका ट्विटवरून तो आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यावरुन संताप व्यक्त केला जात असून महिला आयागानेही याची दखल घेत सिद्धार्थला नोटीस पाठवली आहे. यातच आता सायना नेहवालचे वडील हरवीर सिंह नेहवाल यांनी सुद्धा टाइम्स नाऊशी संवाद साधताना संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मुलीने देशासाठी पदकं जिंकली आहेत, त्याचे देशासाठी काय योगदान आहे? असा प्रश्न हरवीर सिंह नेहवाल यांनी विचारला आहे.
"माझ्या मुलीसाठी अशा प्रकारचे शब्द वापरल्याने मला खूप वाईट वाटलं. त्याने देशासाठी काय केले आहे? तिने देशासाठी पदकं जिंकली आहेत, देशाला गौरव मिळवून दिला आहे, भारत एक महान समाज आहे, असे मी नेहमीच मानत आलो आहे. सायनाला पत्रकार आणि क्रीडा बंधूंचा पाठिंबा आहे कारण एका खेळाडूला किती संघर्ष करावा लागतो हे त्यांना माहीत आहे", असे हरवीर सिंह नेहवाल यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सायना नेहवालने नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक ट्विट केले होते. त्यामध्ये तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेतील त्रुटीवरून चिंता व्यक्त केली होती. जर आपल्या पंतप्रधानांच्या सुरक्षेवरच प्रश्न उपस्थित होत असतील, तर तो देश स्वत:ला सुरक्षित म्हणू शकत नाही. पंजाबमध्ये जे काही घडले, त्याची मी कठोर शब्दांत निंदा करते, असे ट्विट तिने केले होते. सायना नेहवालच्या ट्विटवर अभिनेता सिद्धार्थने ट्विट केले होते. यामध्ये त्याने द्विअर्थी शब्दांचा वापर करत पुढे शेम ऑन यू रिहाना असे लिहिले होते. लोकांनीही त्याच्या या ट्वीटवर आक्षेप घेतला. तसेच महिला आयोगानेही यासंदर्भात तक्रार केली. वादानंतर सिद्धार्थने स्पष्टीकरण देत आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ घेतल्याचे तो म्हणाला होता. कोणाचाही अपमान करण्याचा प्रयत्न केला नसल्याचेही त्याने म्हटले होते.
महिला आयोगाची कारवाई या प्रकरणानंतर महिला आयोगाकडून सिद्धार्थला नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच आयटी अॅक्ट अंतर्गत त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यासही सांगण्यात आले आहे. महिला आयोगानं ट्विटरला हे ट्वीट हटवण्यासंदर्भातही कारवाई करण्यास सांगितले आहे. याशिवाय महिला आयोगाने मुंबई पोलीस आणि ट्विटरकडून यासंदर्भात अहवाल मागवला आहे. आयोग याप्रकरणी कारवाई करत असल्याची माहिती महिला आय़ोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ट्विटरद्वारे दिली. सिद्धार्थने यापूर्वी रंग दे बसंती या चित्रपटातही भूमिका साकारली होती. यापूर्वी त्याच्या वक्तव्य, ट्विटवरून वाद निर्माण झाला होता.