मध्य प्रदेशचे माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी इंदूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांना NOTA हे बटण दाबण्याचं आवाहन केलं आहे. आपला काँग्रेसचा उमेदवार चोरीला गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ज्यांनी उमेदवार चोरला त्यांना धडा शिकवण्यासाठी NOTA बटण दाबावं असं म्हणत माजी मंत्र्याचं हे आवाहन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
इंदूरमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराने उमेदवारी दाखल केल्यानंतर भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याची मध्य प्रदेशात स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे. इंदूरचे काँग्रेसचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने आता भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनी इंदूर लोकसभा मतदारसंघातील लोकांना NOTA बटण दाबण्याचं आवाहन केलं आहे.
यानंतर आता माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. माजी मंत्री सज्जन सिंह वर्मा यांनी म्हटलं आहे की, त्यांचा काँग्रेस उमेदवार चोरीला गेला आहे, त्यामुळेच जनतेला NOTA बटण दाबण्याचं आवाहन केलं जात आहे. नोटा बटण दाबून ज्यांनी काँग्रेसचे उमेदवार चोरले त्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते राज आशिष अग्रवाल यांच्या मते, इंदूरसारख्या मोठ्या शहरात काँग्रेस नेत्यांना NOTA बटण दाबण्याचे आवाहन करावे लागले, हे काँग्रेसचे दुर्दैव आहे. नेहरूंच्या काँग्रेसच्या विचारसरणीत आणि गांधींच्या विचारसरणीत खूप फरक आहे. हे जनतेला समजले आहे, त्यामुळेच काँग्रेसला आपल्या अस्तित्वासाठी लढावे लागत आहे असेही ते म्हणाले.