नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूर्वीच्या चहावाल्याचा विसर पडून आता राजकीय लाभासाठी चौकीदाराबद्दल प्रेमाचे भरते आले आहे, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी रविवारी केली.‘पीटीआय’ वृत्तसंस्थेस दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मै भी चौकीदार’ या मोहिमेचा खरपूस समाचार घेताना ७० वर्षांचे सिब्बल म्हणाले, पूर्वी मोदींनी चहावाल्यांचा खूप उदोउदो केला होता. आता त्यांना चौकीदारांची आठवण झाली. पुढच्या वेळी त्यांना वेगळेच कोणी आठवेल. शेतकऱ्यांची हलाखी, रोजगाराची वानवा, उद्योग-धंद्यांवरील संकट, सामान्य माणसांच्या दैनंदिन समस्या या सर्व आघाड्यांवर अपयश आल्याने लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ही ‘चौकीदार’ मोहीम सुरू करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.रोजगार हाच काँग्रेसचा मुख्य मुद्दा : सॅम पित्रोदारोजगाराच्या मुद्द्यावर काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सारे लक्ष केंद्रित करणार आहे, असे या पक्षाच्या जाहीरनामा समितीचे सदस्य व दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञ सॅम पित्रोदा यांनी म्हटले आहे. देशात सध्या पुरेशा प्रमाणात रोजगारनिर्मिती होत नसल्याने संकट निर्माण झाले आहे, असेही ते म्हणाले. गांधी कुटुंबीयांचे सल्लागार व इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख असलेले सॅम पित्रोदा म्हणाले की, नोटाबंदी व जीएसटीची अंमलबजावणी या निर्णयांमुळे रोजगारनिर्मितीचा पायाच डळमळीत झाला आहे.
'राजकीय फायद्यासाठी मोदींना आता चहावाला सोडून चौकीदार आठवला'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 5:15 AM