नवी दिल्ली- आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Narendra Giri Death) यांना आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या संशयावरून पोलिसांनी शिष्य आनंद गिरी व अन्य दोघांना अटक केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक ओ. पी. पांडे आणि भाजप व समाजवादी पक्ष यांच्या स्थानिक नेत्यांचीही पोलीस चौकशी करणार आहेत. याच दरम्यान भाजपा खासदाराने एक मोठा दावा केला आहे. "महंत नरेंद्र गिरी यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट बनावट आहे. नरेंद्र गिरी आत्महत्या करूच शकत नाहीत. त्याची हत्या करण्यात आली आहे " असा खळबळजनक दावा भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी (BJP Sakshi Maharaj) केला आहे.
"नरेंद्र गिरींच्या मृत्यू प्रकरणाची संपूर्ण चौकशी सीबीआयद्वारे करावी अशी मागणी देखील केली आहे. महंत आत्महत्या करूच शकत नाहीत. त्याची हत्या करण्यात आली आहे" असं साक्षी महाराज यांनी म्हटलं आहे. सुसाईड नोटमध्ये नरेंद्र गिरी यांनी ज्या बलवीर गिरी यांना उत्तराधिकारी बनवण्याचं लिहिलं आहे, त्यांनी आपल्या गुरूच्या हस्ताक्षरावरून दोन वेगवेगळी विधानं केली आहेत. नरेंद्र गिरींच्या सुसाईड नोटमधील हस्ताक्षर हे आपल्या गुरुंचेच आहे असं बलवीर गिरी मंगळवारी म्हटलं होतं. पण आज त्यांना हस्तक्षराबाबत विचारण्यात आलं तर त्यांनी ते ओळखण्यास नकार दिला.
नरेंद्र गिरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मृत्यू झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. गिरी यांच्या मृतदेहावर बुधवारी पोस्टमॉर्टम झाले. जवळपास अडीच तास पोस्टमॉर्टम सुरू होते. पोस्टमॉर्टम रिपोर्ट वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सीलबंद पाकिटात देण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. घटनास्थळावरुन पोलिसांना 6-7 पानांची सुसाईड नोट मिळाली असून यात वादग्रस्त शिष्य आनंद गिरी यांचे नाव लिहिल्याचं स्पष्ट झालं आहे. नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटवरून त्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आल्याचं समोर येत आहे. तसेच त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं होतं. नरेंद्र गिरी यांचे शिष्य आनंद गिरी यांनी "एका मुलीसोबत त्यांचा फोटो मॉर्फ्ड करून" त्यांना ब्लॅकमेल केल्याची माहिती आता समोर आली आहे.
"मुलीसोबत फोटो मॉर्फ्ड करून मला ब्लॅकमेल केलं गेलं"; नरेंद्र गिरींच्या 'सुसाईड नोट'मुळे खळबळ
महंत नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. "आपल्या मृत्यूसाठी आनंद गिरी, अद्या प्रसाद तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी हे जबाबदार आहेत. मी प्रयागराजच्या पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो की, माझ्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्या या लोकांवर कारवाई करा. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मला कळलं की आनंद गिरी हे माझा एका मुलीसोबतचा मॉर्फ्ड फोटो व्हायरल करणार होते. आनंदने मला सांगितलं की एकदा हे पसरलं की, तुम्ही किती लोकांसमोर तुमचं निर्दोषत्व सिद्ध कराल?’ मी आतापर्यंत माझं आयुष्य सन्मानाने जगलो आहे आणि भविष्यात मी ज्या अपमानाला सामोरे जाईन त्यानंतर त्या आरोपांसह मी जगू शकत नाही" असं नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.