नवी दिल्ली - देशातील नामवंत कुस्तीपटू आणि ऑलिंपिक पदक विजेता बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगाट यांच्या नेतृत्वात कुस्तीपटूंचे ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात गेल्या एका महिन्यांपासून आंदोलन सुरू होते. पण, आता या तिघांनी आपल्या नोकरीवर परतण्याचा निर्णय घेतला आहे. नोकरीवर परतले असले तरीदेखील पैलवानांचा विरोध कायम राहणार आहे. साक्षी मलिकने याबाबत ट्विट करुन माहिती दिली. त्यानंतर, साक्षीच्या पतीनेही माध्यमांतील वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलंय.
मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर रेल्वे मुख्यालयाच्या रेकॉर्डनुसार, हरिद्वारमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर दुसऱ्याच दिवशी, ३१ मे रोजी साक्षी बडोदा हाउस ऑफिसमध्ये नोकरीवर परतली. साक्षीने नोकरी जॉइन करताच रेल्वे इंटर डिव्हिजन चॅम्पियनशिपलाही मान्यता दिली आहे. साक्षी, विनेश आणि बजरंग OSD स्पोर्ट्स पदावर कार्यरत आहेत. साक्षीने आंदोलनातून माघार घेतल्याचे वृत्त मीडियात आणि सोशल मीडियात झळकले. मात्र, आपण माघार घेतली नसून आमचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं साक्षीने म्हटलंय. साक्षीसह तिचा पती सत्यवर्त कादियननेही हे वृत्त चुकीचं असून आमचं आंदोलन कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचे त्याने म्हटलं आहे.
माध्यमात आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत, आम्ही कुठेही माघार घेतली नाही. कृपया अशाप्रकाराच्या बातम्या देऊ नका. याउलट आमचं आंदोलन अधिक तीव्र होईल. आमच्या समर्थकांना कमकुवत करण्याचा हा प्रयत्न आहे, पण हा अयशस्वी होईल, असे साक्षी मलिकचा पती सत्यवर्त कादियन यांनी म्हटलंय.
विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन पुकारले होते. पैलवान 23 एप्रिलपासून जंतरमंतरवर होते. कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. याआधी जानेवारीमध्येही कुस्तीपटूंनींनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलन केले होते. मात्र, क्रीडा मंत्रालयाच्या मध्यस्थीनंतर कुस्तीपटू परतले.
कुस्तीपटूंनी अमित शहा यांची भेट घेतली
दरम्यान, शनिवारीच कुस्तीपटूंनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. कुस्तीपटू साक्षी मलिकचे पती सत्यव्रत कादियन यांनी आजतकशी बोलताना या भेटीची पुष्टी केली होती. या बैठकीला तेही उपस्थित होते. बैठकीत कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांना अटक करण्याची मागणी उचलून धरल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ही बैठक अनिर्णित राहिली. गृहमंत्र्यांकडून आम्हाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे आम्ही बैठकीतून बाहेर पडलो, असे त्यांनी सांगितले. पण, आता आज कुस्तीपटूंनी आपापल्या नोकरीवर परतण्याचा निर्णय घेतला आहे.