प्रयागराज - दलित मुलाशी लग्न केलेल्या उत्तर प्रदेशातीलभाजपा आमदाराच्या मुलीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. उत्तर प्रदेशमधील आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा हिने व्हिडीओच्या माध्यमातून वडिलांकडून जीवाला धोका असल्याचं सांगितलं होतं. तसेच कुटुंबियांच्या विरोधात जाऊन दलित तरुणाशी लग्न केल्यामुळे वडिलांनी आपल्याला मारायला गुंड पाठवल्याचं तिने म्हटलं होतं. साक्षी मिश्रा हिने घरच्या व्यक्तींपासून जीवाला धोका असल्याने पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यासाठीच साक्षी आणि तिचा पती सोमवारी (15 जुलै) अलाहाबाद न्यायालयात हजर झाले होते.
अलाहाबाद न्यायालयाबाहेर साक्षी आणि अजितेश आले असता काही जणांनी त्यांना मारहाण केली. साक्षीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून वडिलांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा तिने केला होता. त्यानुसार सुरक्षेची मागणी करण्यासाठी दोघेही आज न्यायालयात आले होते. त्यावेळी काही लोकांनी अजितेश आणि साक्षीला मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. मात्र त्यांच्या वकिलांनी फक्त अजितेशला मारहाण झाल्याचं म्हटलं आहे.
साक्षी आणि अजितेश यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, फक्त अजितेश याला मारहाण करण्यात आली. ते लोक कोण होते याची माहिती मिळू शकलेली नाही. पण यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सिद्ध झालं असून यासाठीच ते पोलीस सुरक्षा मागत होते. अलाहाबाद न्यायालयाने साक्षी आणि अजितेशचे लग्न वैध ठरवले आहे. तसेच दोघांना सुरक्षा देण्याचे आदेश दिले आहेत.
राजेश मिश्रा हे भाजपाचे आमदार आहेत. साक्षीने काही दिवसांपूर्वी पळून जाऊन अजितेश कुमार या दलित तरुणाशी लग्न केले होते. मात्र कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने त्यांनी तिला मारायला गुंड पाठवल्याच साक्षीने व्हिडीओत म्हटलं होतं. अजितेशच्या नातेवाईकांना देखील त्रास देत असल्याचं सांगितलं.
'पप्पा…तुम्ही राजीव राणाप्रमाणे माझ्यामागे गुंड पाठवलेत. आमचा जीव धोक्यात आहे. अभी आणि त्याच्या नातेवाईकांना त्रास देणं थांबवा. मला आनंदी राहायचं आहे, शांततेत जगू द्या. भविष्यात जर मला, अभी किंवा त्याच्या कुटुंबाला काही झालं तर यासाठी माझे वडील भाऊ आणि राजीव राणा जबाबदार असतील. जे माझ्या वडिलांना मदत करत आहेत, त्यांनी मदत करणं थांबवा' असंही साक्षीने व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. आपल्या नातेवाईकांपासून जीवाला धोका असल्याने पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी साक्षीने केली होती.