नवी दिल्ली - निर्मल सिंह रंसवाल १२ वी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर जपानला गेला, त्याठिकाणी तो शेती करतो, ऐकून चकीत झाला ना...उत्तराखंडच्या चंपावतमधील निर्मल शेती करण्यासाठी जपानला गेलेला एकमेव भारतीय नाही. जपानच्या एकूण लोकसंख्येपैकी २० टक्क्याहून अधिक लोकसंख्या वृद्ध लोकांची आहे. त्यामुळे तेथील शेती उद्योगावर मोठे संकट उभे राहिले आहे. याच कारणामुळे जपान भारताच्या कानाकोपऱ्यातून कुशल लोक जपानला घेऊन जात आहे.
आता जपाननं भारत सरकारसोबत एक करार केला आहे. त्या करारानुसार भारतीय युवकांना जपानच्या गरजेनुसार ट्रेनिंग देण्याचं काम हाती घेतले आहे. मागील वर्षी जपान जाणाऱ्या १८ जणांमध्ये निर्मल सिंहचा समावेश होता. यावर्षीही अनेक युवक जपानला जाणार आहेत. अरुणाचल प्रदेशमधील मोनित डोली जो एका रेस्टॉरंटमध्ये काम करायचा. त्याच्याकडे पीजी डिप्लोमाची डिग्री आहे. आता तो जपानच्या नारा शहरात राहतो.
मोनित सकाळी ३ वाजता उठतो, शेतात जातो. त्याठिकाणी यूनिफॉर्ममध्येच असतो. पायात बूट आणि हातात ग्लव्स घातलेले असतात. कवि लूथरा हे युवकांना रोजगार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत काम करणारी कंसल्टिंग फर्ममध्ये एमडी आहे. ते सांगतात की, जपानला जगातील युवकांची गरज आहे हे सत्य आहे. परंतु कुशल युवकांनाच संधी दिली जाते. केवळ शेती करणाऱ्यांची नव्हे तर इतर क्षेत्रातही युवक हवेत असं त्यांनी म्हटलं.
भारत सरकारच्या आकडेवारीनुसार, डिसेंबर २०२२ पर्यंत भारतातून ५९८ युवक जपानला गेले आहेत. त्या सर्वांनी राष्ट्रीय कौशल्य विभागाकडून ट्रेनिंग घेतले होते. महाराष्ट्रातूनही ३४ युवक जपानला गेल्याची माहिती कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. लोढा म्हणाले की, भारतीय युवकांकडे शेतीचं कौशल्य असून त्यात जपानमध्ये रोजगाराच्या चांगल्या संधी आहेत. तिथे १.२ लाख येन म्हणजेच ७५ हजार रुपये मासिक पगार दिला जातो. त्याचसोबत ओवरटाईमचेही पैसे दिले जातात असं त्यांनी सांगितले.