- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कुलभूषण जाधव फाशीप्रकरणी दी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) भारताची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी फक्त एक रुपया फी घेतल्याची परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी माहिती दिली. पाकिस्तानी न्यायालयाने जाधव यांना मृत्युदंड ठोठावला आहे. जाधवप्रकरणी बाजू मांडण्यासाठी भारताला साळवेंहून कमी फीमध्ये दुसरा चांगला वकील मिळू शकला असता, असे टष्ट्वीट संजीव गोयल नावाच्या व्यक्तीने केले होते. त्यास स्वराज यांनी वरीलप्रमाणे उत्तर टिष्ट्वटरवरच दिले. सुषमा म्हणाल्या, हे खरे नाही. हरीश साळवे यांनी हा खटला लढविण्यासाठी फी म्हणून केवळ एक रुपया घेतला आहे. आयसीजे जाधव प्रकरणाची सुनावणी करीत असून, साळवे या खटल्यात भारताचे मुख्य वकील आहेत. भारताने आयसीजेत याचिका दाखल करून जाधव यांचा मृत्युदंड तत्काळ रोखण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तान आयसीजेत सुनावणी होण्यापूर्वीच जाधव यांना फाशी देऊ शकतो, अशी भीतीही भारताने आयसीजेत व्यक्त केली आहे. जाधव भारताची गुप्तचर संघटना रॉचे एजंट असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. भारताने यांचा इन्कार केला असून जाधव यांचे सरकारशी कोणतेही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. आयसीजेने सोमवारी भारत आणि पाकिस्तान दोघांचेही युक्तिवाद ऐकले. जाधव यांचा मृत्युदंड ठोठावल्याविरुद्ध भारताने आठ मे रोजी आयसीजेत धाव घेऊन पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात आले, असे भारताने आपल्या याचिकेत म्हटले आहे.