कोलकाता : कोलकात्यात काही शाळांच्या परिसरात अमली पदार्थांच्या कँडीज आणि चॉकलेट्सची विक्री होत असल्याच्या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली असून, आयसीएसई शाळांच्या प्रमुखांनी याची दखल घेत परिसरावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.ड्रग्ज असलेले गोड पदार्थ (चॉकलेटस, कँडी) शाळेच्या परिसरात विक्री होत असल्याचे वृत्त आल्यानंतर शिक्षक व पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आयसीएसई शाळांच्या बंगाल चॅप्टरचे महासचिव नबरुन डे म्हणाले की, शाळेच्या परिसरात खाद्यपदार्थ व चॉकलेट आदींची विक्री करणाºयांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठीच्या उपाययोजना सुरु आहेत. डे म्हणाले की, या असोसिएशनमध्ये २०० शाळा आहेत. त्यांना दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण, अद्याप याबाबत कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत.सेंट्रल मॉडर्न स्कूलचे प्राचार्य असलेले नबरुन डे यांनी सांगितले की, आमच्या विद्यार्थ्यांचे आरोग्य आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. आम्ही सर्व पालकांना सुरक्षिततेबाबत आश्वासन देऊ इच्छितो. या असोसिएशनचे सदस्य आणि प्राचार्य रंजन मित्तर म्हणाले की, ड्रग्ज कँडीजबाबत सावधानतेची सूचना संबंधितांना देण्यात येईल.तरुण विद्यार्थी लक्ष्य-बेकायदेशीर ड्रग्जची विक्री वाढविण्यासाठी याचे व्यसन करणारे तरुण विद्यार्थी मिळविण्यासाठी हे प्रयत्न आहेत, असे वृत्त आहे. याची गंभीर दखल शाळांनी घेतली आहे. या वृत्तामुळे पालकांमध्येही भीती पसरली असून शाळेच्या परिसरात विक्रेत्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
कोलकात्यात शाळेबाहेर अमली पदार्थांची विक्री? : परिसरावर लक्ष ठेवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 2:16 AM