नवी दिल्ली : पाकिस्तान व चीनचे नागरिकत्व पत्करलेल्या लोकांच्या भारतामध्ये मालमत्ता आहेत. त्यातून त्यांना बेदखल करण्याची तसेच या मालमत्ता विकण्याची प्रक्रिया केंद्रीय गृह मंत्रालयाने सुरू केली आहे. अशा मालमत्तांना शत्रू मालमत्ता (एनिमी प्रॉपर्टी) असे म्हटले जाते. अशा देशभरात १२६११ मालमत्ता असून, त्यांची किंमत सुमारे १ लाख कोटी रुपये आहे.
या मालमत्ता सध्या कस्टोडियन ऑफ एनिमी प्रॉपर्टी फॉर इंडिया (सीइपीआय) यांच्या ताब्यात आहे. त्यांची विक्री करण्यासाठी असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाने सुधारणा केली आहे. शत्रू मालमत्ता गटातील ज्या मालमत्तांची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे, ती जागा खरेदी करण्यासाठी सध्या तिथे राहत असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. त्याने ही जागा विकत न घेतल्यास नियमांनुसार ती इतरांना विकण्यात येईल.
१ कोटी रुपये व त्याहून अधिक आणि १०० कोटी रुपयांपेक्षा कमी मूल्य असलेल्या शत्रू मालमत्तांची सीइपीआय इ-लिलाव किंवा अन्य कायदेशीर मार्गाने विक्री करू शकते. शत्रू मालमत्तेपैकी सोने, शेअर अशा जंगम संपत्तीची विक्री करून केंद्र सरकारला आतापर्यंत ३४०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. मात्र, शत्रू मालमत्तांपैकी १२६११ जागांची अद्याप सरकारने विक्री केली नव्हती.