ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - दहशतवादी संघटना इसीसविरोधात गाणं गायल्याने मुस्लिम गायिका नाहीदा आफरीनला जारी करण्यात आलेल्या फतव्याविरोधात ज्येष्ठ पटकथाकार सलीम खान मैदानात उतरले आहेत. सलीम खान यांनी फतवा काढणा-या मौलवींना धारेवर धरत चांगलंच झापलं आहे. आसाममधील एक दोन नाही तर तब्बल 46 मौलानांनी 16 वर्षांची गायिका नाहिद आफरीनविरोधात फतवा जारी केला आहे. नाहिद आफरीन 2015 मध्ये रिअॅलिटी शो इंडियन आयडल ज्युनिअरमध्ये फर्स्ट रनर अप होती. आफरीनला लोकांसमोर गाणं गाण्यापासून रोखता यावं यासाठी हा फतवा जारी करण्यात आला आहे.
सलीम खान यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त करत आपलं मत मांडलं आहे. 'फतवा म्हणजे न्यायालयीन निर्णय किंवा कोणत्या इस्लामिक विचारवंताचं मत नाही याची फतवा काढणा-यांना माहितीही नसेल', असं सलीम खान बोलले आहेत. 'माध्यमं त्यांना मौलवी म्हणतात आणि या कथित मौलवींची योग्यताही नसते, इतकं त्यांना महत्त्वं आणि आदर देतात', असं म्हणत त्यांना चांगलंच झापलं आहे.
Media called them clerics and by doing so have given them intellectual respectability which they dont deserve at all.— Salim Khan (@luvsalimkhan) March 17, 2017
They dont even know that Fatwa is not a verdict or judgement and is an opinion given by an islamic scholar.— Salim Khan (@luvsalimkhan) March 17, 2017
सलीम खान यांनी मोहम्मद पैगंबरच उदाहरण देत, 'मोहम्मद पैगंबर यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात कधीही कुठल्या गोष्टीविरोधात फतवा काढला नसल्याचं', सांगितलं आहे. या मौलवींमुळे इस्लामच्या अनुयायांना शरमेनं मान खाली घालावी लागते, अशी टीका सलीम खान यांनी केली.
Prophet Mohd during his lifetime had nvr given Fatwa on any issue.These so called clerics are a huge embarassment to the followers of islam— Salim Khan (@luvsalimkhan) March 17, 2017
काय आहे प्रकरण -
आसाममधील एक दोन नाही तर तब्बल 46 मौलानांनी 16 वर्षांची गायिका नाहिद आफरीनविरोधात फतवा जारी केला आहे. नाहिद आफरीन 2015 मध्ये रिअॅलिटी शो इंडियन आयडल ज्युनिअरमध्ये फर्स्ट रनर अप होती.
मध्य आसाममधील होजई आणि नागाव जिल्ह्यात काही पत्रकं वाटण्यात आली ज्यामध्ये आसामी भाषेत फतवा आणि फतवा जारी करणा-यांची नावे लिहिण्यात आली होती. फतव्यानुसार 25 मार्च रोजी आसाममधील लंका परिसराक उदाली सोनई बाबी कॉलेजमध्ये नाहिदचा कार्यक्रम होणार असून हा पुर्णपणे शरियाच्या विरुद्ध आहे. फतव्यात सांगितल्याप्रमाणे, 'म्यूझिकल नाईटसारख्या गोष्टींना शरियात स्थान नाही. अशा गोष्टी जर मशीद, मदरसा आणि दफनभुमीजवळ होऊ लागल्या तर आपल्या पुढील पिढीला अल्लाहच्या नाराजीला सामोरं जावं लागेल'.
फक्त 16 वर्षांची असलेली गायिका नाहिद आफरीन सध्या दहावीत शिकत आहे. फतव्याच्या माहिती मिळताच तिला अश्रू अनावर होऊ लागले. 'मी यावर काय बोलणार. मला आश्चर्याचा धक्का बसला आहे. मला मिळालेलं संगीत हे देवाचं देणं मला मिळालेला आशिर्वाद आहे. अशा धमक्यांना घाबरुन मी संगीतापासून दूर जाणार नाही', अशी प्रतिक्रिया नाहिदने दिली आहे.