मुंबई: 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर न्यायालयाने गुरुवारी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरवले. तर या प्रकरणातील सहआरोपी अभिनेता सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायालयाच्या या निकालामुळे सलमान खानला मोठा झटका बसला आहे.
मात्र, आता सर्वांचे लक्ष सलमान खान याला किती वर्षांची शिक्षा होणार याकडे लागले आहे. सलमान खानला तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास हे प्रकरण सत्र न्यायालयात जाईल. त्यामुळे सलमान खानला जामीन मिळवण्यासाठी सत्र न्यायालयातच धाव घ्यावी लागेल. मात्र, आजचा दिवस संपायचा आधी सत्र न्यायालयातील जामिनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास सलमानला नाईलाजाने तुरूंगात जावेच लागेल. यावेळी त्याची रवानगी जोधपूर सेंट्रल जेलमध्ये होऊ शकते. येथेच लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी आसाराम बापूदेखील आहेत. त्यांच्या बाजूच्या बॅरॅकमध्ये सलमान खानला ठेवण्याची शक्यता आहे. मागील वेळेस जेव्हा सलमान खानला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हा त्याला बरॅक नंबर 1 मध्ये ठेवण्यात आले. तेथे सलमान पाच दिवस होता. तेव्हा त्याचा कैदी क्रमांक 343 होता.