ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - हिट अँड रन प्रकरणात सलमान खानला दिलासा मिळण्याची शक्यता असून, मृत साक्षीदार रवींद्र पाटील याची साक्ष कोर्ट ग्राह्य धरणार नाही असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सलमान खानचा अंगरक्षक असलेल्या कॉन्स्टेबल रवींद्र पाटीलने मृत्यूपूर्व जबानीत अपघाताच्यावेळी सलमानच गाडी चालवत होता अशी साक्ष दिली होती.
मात्र, रवींद्र पाटीलच्या साक्षीवर पूर्ण विश्वास ठेवता येणार नाही असे न्यायालयाने म्हटलं आहे. सत्र न्यायालयाने त्याची साक्ष ग्राहय धरण्याची चूक केली असेही न्यायालयाने म्हटले आहे. यामुळे या खटल्यात सलमानची बाजू बळकट झाली असून, त्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मे महिन्यात सत्र न्यायालयाने सलमानला हिट अँड रन प्रकरणात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली दोषी ठरवून पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
त्याने या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. २८ सप्टेंबर २००२ च्या रात्री सलमानने त्याच्या बांद्रयातील घरी परतत असताना अमेरिकन बेकरीबाहेर झोपलेल्या पाचजणांना आपल्या आलिशान लँण्ड क्रूझर गाडीखाली चिरडल्याचा आरोप आहे. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता तर, चारजण जखमी झाले होते. सलमान मद्याच्या अंमलाखाली गाडी चालवत होता.
मी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला पण त्याने ऐकले नाही असे रविंद्र पाटील यांनी आपल्या साक्षीत म्हटले होते. हा अपघात पाहणा-या प्रत्यक्षदर्शींनी सलमान कारचालक ज्या बाजूने उतरतो तिथून बाहेर पडल्याची साक्ष दिली होती. त्या रात्री सलमान नव्हे तर, अशोक सिंह गाडी चालवत होता असा सलमानच्या वकिलांचा युक्तीवाद आहे.