नवी दिल्ली - काँग्रेसचे जेष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी काँग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यावर पहिल्यांदा खुर्शीद यांनी वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांनी पद सोडणं हीच काँग्रेससाठी समस्या असल्याचं सलमान खुर्शीद यांनी म्हटलं आहे. 'आमचे नेते सोडून गेले हीच आमची मोठी समस्या आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर पक्षावरील संकट आणखी वाढलं आहे' असं खुर्शीद यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींच्या या निर्णयामुळे लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतरही पक्षाला आत्मपरीक्षण करता आलेले नाही. लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला याचं विश्लेषण करण्यासाठी आम्हाला अजूनही एकत्र येता आलेलं नाही अशी खंत खुर्शीद यांनी व्यक्त केली आहे. राहुल यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर उणीव जाणवू लागली आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षासमोरील संकट आणखी वाढलेलं दिसत आहे. हे पद सध्या सोनिया गांधी यांनी सांभाळलं आहे अशी माहिती सलमान खुर्शीद यांनी दिली आहे.
सलमान खुर्शीद यांनी 'राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा द्यायला नको होता. त्यांनी अजूनही या पदावर राहायला हवं होतं, असं मला वाटतं. राहुल गांधी या पदावर कायम राहावेत आणि नेतृत्व त्यांच्याकडे असावे असे फक्त मलाच नाही तर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनाही वाटत आहे. सोनिया गांधी यांनी हे पद सांभाळलं असलं तरी ती एक तात्पुरती व्यवस्था आहे' असं म्हटलं आहे.
पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस रणनीती बनवणार
हिंदी भाषिक राज्यांत पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेस रणनीती बनवत आहे. उच्च पदस्थ सूत्रांनुसार उत्तर प्रदेशची प्रभारी असतानाही काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या रणनीतीच्या केंद्रस्थानी आहेत. प्रियंका गांधी आधी उत्तर प्रदेशमध्ये पक्ष तळागाळात उभा करण्याचा प्रयत्न करतील व त्यानंतर बिहार, छत्तीसगड, राजस्थान, पंजाबसारख्या उत्तर भारतातील राज्यांत काँग्रेसला बळकट केले जाईल. उत्तर प्रदेशमध्ये दशकांपासून सत्तेपासून वंचित राहिलेला काँग्रेस पक्ष आता सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नांत आहे. त्यासाठी प्रियंका गांधी यांनी राज्याच्या जुन्या काँग्रेस नेत्यांना मार्गदर्शन मंडळात सामावून घेऊन राज्याची सूत्रे तरूण नेत्यांच्या हाती सोपवली आहे. दोन वेळा आमदार असलेले अजय कुमार लल्लू यांना गांधी यांनी राज बब्बर यांच्या जागी अध्यक्ष नियुक्त केले तर 12 सरचिटणीस, 4 उपाध्यक्ष, 18 सल्लागार समिती सदस्य आणि 8 कार्यकारी दल स्थापन केले आहेत.