ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २५ - अभिनेता शाहरूख खानच्या 'कल हो ना हो' या लोकप्रिय चित्रपटातील टायटल साँगवर काँग्रेस नेते सलमान खुर्शीद नृत्य करतानाचा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. 'लेबे झेत-कल हो ना हो' असे या अल्बमचे नाव असून जर्मनीचे भारतातील राजदूत मायकल स्टॅनर यांनी हा व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत सलमान हे प्रीती झिंटावर फिदा असणा-या सैफच्या भूमिकेत तर स्टॅनर शाहरुखच्या आणि त्यांची पत्नी एलिस ही प्रीती झिंटाच्या भूमिकेत दिसत आहे.
या अल्बमचा प्रिमिअर शो नुकताच पार पडसला त्यावेळी खुद्द सैफ अली खान, त्याची आई व अभिनेत्री शर्मिला टागोर, तसेच जावेद अख्तर, मधू किश्वार आणि दिग्दर्शक सुमीत ओस्मांड शॉ हे उपस्थित होते.
' या अल्बममुळे भारत-जर्मनीतील संबंधांत एक वेगळी आत्मियता निर्माण होईल, अशी आशा सलमान खुर्शीद यांनी यावेळी व्यक्त केली. ज्याप्रमाणे राजकारणात उद्या काय होईल याची शाश्वती नसते, तसंच आपल्या आयुष्याचही असतं. म्हणूनच आजच पूर्ण आयुष्य जगून घ्या, पुढे काय होणार कोणी बघितलंय, असा संदेश आम्ही व्हिडीओतून दिला आहे,' असे खुर्शीद म्हणाले. तर या अल्बमद्वारे मला बॉलिवूड व भारतीय कलाकारांबद्दल आदर व्यक्त करायचा होता, असे स्टॅनर यांनी सांगितले. मला व माझ्या पत्नीला बॉलिवूडच्या चित्रपटांचं वेड असून आम्ही दीडशेहून अधिक चित्रपट पाहिले असल्याचेही ते म्हणाले.