नवी दिल्ली : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला झालेली ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा तहकूब ठेवण्याचा राजस्थान उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी रद्द करून या प्रकरणी नव्याने सुनावणी करण्याचा आदेश दिला. यामुळे सलमानवर खऱ्या अर्थाने संक्रांत गुदरली आहे. न्या. एस. जे. मुखोपाध्याय व न्या. ए. के. गोयल यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. उच्च न्यायालयाने केवळ कायद्याच्या चौकटीत राहून याप्रकरणी नव्याने सुनावणी करावी, असे सांगितले. या प्रकरणातील गुणावगुणांकडे लक्ष न देता, केवळ या सिनेनटाभोवती असलेल्या वलयामुळे व त्याला ब्रिटनला जाण्यास व्हिसा मिळावा, म्हणून दिलेल्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निकालावर प्रश्नचिन्ह उभे करीत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी आपला निकाल रोखून ठेवला होता. जर उच्च न्यायालयाकडून स्थगिती लावली गेली नाही तर त्याला परदेश प्रवास करण्यात अडचणी येतील असे सलमानने एका याचिकेत म्हटले होते. राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
सलमानवर संक्रांत
By admin | Published: January 15, 2015 5:34 AM