रायपूर - आयुष्याच्या प्रवासात अनेक अडचणी येत असतात, या अडचणींवर मात देऊन, संघर्ष करुनच आपल्याला पुढे जायचं असतं. मध्य प्रदेशच्या रायपूरमधील एका जवानानेच्या संघर्षाचीही अशीच कहाणी आहे. एका अपघातात दोन्ही पाय गमावल्यानंतर पुन्हा ड्युटी जॉईन करायची आणि पूर्ववत जीवन जगायचं सोप्प नव्हतं. मात्र, बहाद्दर जवानाने ते करुन दाखवलं. पत्नी आणि कुटुंबीयांच्या साथीमुळेच ते पुन्हा आपल्या दोन्ही पायांवर उभे राहिले. भिलाई येथील जवान अभिषेक निर्मलकर यांचे पाय नकली आहेत, पण त्यांच्या संघर्षाची गाथा सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे.
भिलाई ते रायपूर असा 35 किमींचा प्रवास करणाऱ्या अभिषेक यांच्या प्रवासाची ही गोष्ट. 17 जानेवारी 2020 ची रात्र मी कधीच विसरु शकत नाही. त्यावेळी, मी अँटी टेरिरिस्ट स्वॉडमध्ये कर्तव्यावर होतो. सायंकाळी ट्रेन सुटल्यामुले रात्री दानापूर एक्सप्रेसमधून घराकडे निघालो होतो. ट्रेनच्या जनरल बोगीतही मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तरीही, ट्रेनच्या गेटवर उभे राहून तो प्रवास करायचं ठरवलं. त्यावेळी भिलाई-3 जवळ अचानक बोगीत धक्काबुक्की झाली. मला स्वत:चा तोल सांभाळणे शक्य न झाल्याने मी रेल्वेतून खाली पडलो. यावेळी ट्रेनखाली सापडलो. त्यानंतर, जेव्हा मी डोळे उघडले, तेव्हा भिलाई येथील एका रुग्णालयात होतो. डोळे उघडल्यानंतर पायाकडे पाहिलं, तर एक पायच गायब होता. दुसरा पायाचीही काहीच हालचाल होत नव्हती. तेवढ्यात डॉक्टर आले आणि दुसरा पायही कापावा लागेल, असं म्हणाले, अशी डोळ्यात पाणी आणणारी आपबिती अभिषेक यांनी सांगितली.
डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करुन माझा दुसरा पायही कापला, त्यावेळी सगळच संपल्याची जाणीव मला झाली. मी डोळ्यात अश्रू आणून देवाकडे मरणासाठी प्रार्थना करू लागलो. कारण, विना पायाचं माझ आयुष्य इतरांसाठी ओझं ठरेल. मी आतून तुटलो होतो, पण कुटुबीयांकडून सातत्याने हिंमत बांधण्याचा प्रयत्न होत होता. माझी पत्नी कुलेश्वरी हिला केवळ अपघात झाल्याची माहिती होती. पण, 10 दिवसांनंतर माझे दोन्ही पाय गेल्याचं समजल्यानंतर तिला धक्काच बसला. मात्र, लवकरतच स्वत:ला सावरुन तिनं माझी जबाबदारी घेण्याचं सांगितलं. रुग्णालयातून डिस्चार्ज घेतल्यानंतर घरी बेडवरच पडून होतो. दीड वर्षाची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा अभिमन्यू यांच्याकडे पाहून खूप रडायला यायचं. मात्र, त्यांच्याकडे पाहूनचं जगायची इच्छा व्हायची, नवीन उमेद मिळायची.
आता आपण कधीच आपल्या पायावर उभं राहू शकणार नाही, ड्युटीलाही जाऊ शकणार नाही, हेच निश्चित केलं होतं. पण, माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि सहकारी मित्रांनी मला उमेद दिली. माझ्यात संचार भरला, मी पुन्हा पायावर उभे राहिल, पुन्हा ड्युटी जॉईन करेल, असा आत्मविश्वास दिला. त्यानुसार, त्यांच्या मदतीने मी कुत्रिम पाय लाऊन घेतले. अपघातानंतर 6 महिन्यांनी मी कुत्रिम पाय लावले. हळूहळू चालू लागलो, अनेकदा पडलो. पण, पुन्हा उठून चालयला लागलो, मित्रांसोबत बाहेर गाडीवर फिरायला लागलो. आता, मित्रांसोबत दररोज 35 किमीचा प्रवास करुन दुचाकीवरुन ड्युटीला जात आहे. आता, माझ्यासह घरातील सर्वचजण खुश आहेत, ती काळरात्र विसरण्याचा प्रयत्न करतोय, एवढचं, असे अभिषेक यांनी सांगितले.