हैदराबाद - कोरोनानंतर देशभरात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पदोपदी माणूसकीचं दर्शन घडत आहे. अगदी निरक्षर अडाणी माणसांपासून ते उच्चविद्याविभूषित व्यक्तीही कोरोनाच्या लढाईत जोमानं काम करताना दिसून येत आहेत. कोरोनामुळे देशात आता ३१ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आलं आहे. म्हणजे, जवळपास २ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लॉकडाऊनचा होणार आहे. या लॉकडाऊनमुळे देशाचं आर्थिक गणित बिघडलंय, तर लाखो मजूरांना हाल-अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. शहरात हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ मजुरांवर आली आहे. त्यामुळे या कामगारांनी आपला घरचा रस्ता धरला आहे.
गावाकडं निघालेले लाखो प्रवासी मजूर हे गाडीचा वाट न पाहता चालतच मैलों मैल अंतर कापत आहेत. एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील तिसऱ्या जिल्ह्याचा प्रवास पायीच पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लर जिल्ह्यातून अशाच काही महिला विजयनगर येथे पायी जात होत्या. उपाशीपोटीच या महिलांचा प्रवास सुरु होता, जवळ खायलाही काही नव्हते. त्यामुळे, या महिलांनी विजयनगरच्या एसपी बी राजा कुमारी यांना फोन केला. या महिलांचा फोन आल्यानंतर, राजा कुमारी यांनी स्वत:च्या घरी या महिलांसाठी भोजन बनवलं. लेमन राईस बनवून या महिलांना स्वत: भेटून त्यांची भूक भागविण्याचं काम एसपी मॅडमने केले.
साधारण रात्री १२ च्या सुमारास मला अननोन नंबरवरुन फोन आला. त्यावेळी, संबंधित महिलांनी, त्या गेल्या २-३ दिवसांपासून चालत असल्याचं मला सांगितलं. तसेच, पोटात अन्नाच कण नसून आम्ही ११ जण विजयनगरच्या चेकपोस्टवर आल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी, मी माझ्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन जेवणाची काही व्यवस्था होतेय का ते पाहा, असे सांगितले. त्यावर, लॉकडाऊनमुळे शक्यता कमी आहे, पण आम्ही ब्रेड भेटेल का ते पाहतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर, ब्रेडही भेटल याची शाश्वती नसल्याने मी घरातच लेमन राईस बनवून चेकपोस्ट नेला, असे राजा कुमारी यांनी सांगितले.
चेक पोस्टजवळील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये या महिला थांबल्या होत्या. या ११ जणांना मी लेमन राईस दिला, त्यांनी जेवण केलं. मग, त्यांची सोय पाहून मी पहाटे ३ ते ४ वाजता घरी पोहोचले. गावातील कुणीतरी या महिलांना माझा नंबर दिला होता. काही अडचण असेल तर यांना कॉल करण्याचे सांगितले होते. त्यामुळे या महिलांना थेट मला कॉल केल्याचेही कुमारी यांनी म्हटले. एसपी मीरा कुमारी यांच्या या संवेदनशीलतेचं विजयनगरमध्ये कौतुक होत आहे. विजयनगर पोलिसांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन फोटो शेअर करत माहिती दिली.