बलवंत तक्षक -
चंडीगड : जर दृढनिश्चय केला तर लाख अडचणींनंतरही तुम्हाला तुमचे ध्येय गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे म्हणतात. असेच काहीसे चंडीगडमध्येही पाहायला मिळाले. ॲसिड हल्ल्यात आपले दोन्ही डोळे गमावलेल्या कैफी नामक विद्यार्थिनीने सीबीएसई इयत्ता दहावीमध्ये ९५.०२% गुण मिळविले आहेत. ती तीन वर्षांची असताना तिच्यावर ॲसिड हल्ला झाला होता.
हल्ल्यानंतर कैफीसाठी आयुष्य सोपे नव्हते. परंतु, दोन्ही डोळे गमावल्यानंतरही तिने हार मानली नाही. तिला नागरी सेवेत रुजू व्हायचे आहे. कैफीचे आतापर्यंतचे आयुष्य निश्चितच आव्हानांनी भरलेले आहे. परंतु, परीक्षेच्या निकालाने तिला आकाशही ठेंगणे झाले.
पालक-शिक्षकांना अभिमान वाटेल, असेच करेन... कैफी चंडीगडमधील सेक्टर २६ येथील इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाइंड या शाळेची विद्यार्थिनी. सीबीएसई दहावी परीक्षेत ९५.०२ टक्के गुण मिळविणाऱ्या कैफीने सांगितले की, ॲसिड हल्ल्यानंतर तीन जणांना दोषी ठरविण्यात आले होते. मात्र, अवघ्या दोन वर्षांत ते तुरुंगातून बाहेर आले. पण त्यांचा गुन्हा आणि माझ्यावरील हल्ला मला पुढे जाण्यापासून रोखू शकत नाही. मी माझ्या पालकांची आणि शिक्षकांची मान उंचावेल, असे काही तरी करून दाखवेन.
३ वर्षांची असताना ॲसिड हल्लाकैफी ३ वर्षांची असताना हरयाणातील हिसारमध्ये तीन जणांनी तिच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकले. आई सुमन व वडील पवन यांनी उपचारासाठी अनेक हॉस्पिटलमध्ये भेट दिली, पण डॉक्टर कैफीचे डोळे वाचवू शकले नाहीत. हल्ल्यातील दोषी मात्र दोन वर्षांत तुरुंगातून बाहेर आले.
वडील सचिवालयात शिपाईपदी कार्यरत -- ॲसिड हल्ल्याच्या घटनेनंतर, आई-वडील कैफीला चांगले शिक्षण देण्यासाठी चंडीगडला घेऊन गेले. वडील पवन हे हरयाणा सचिवालयात शिपाई म्हणून काम करतात आणि कुटुंब शास्त्रीनगरमध्ये राहते. - कैफी सांगते की, दृष्टिहीन विद्यार्थ्यांना व्हिडीओ आणि मल्टीमीडियाच्या माध्यमातून शिकण्यात मोठी मदत झाली आहे. माझे कुटुंब आणि शिक्षक यांच्या मदतीने मला आज परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. - या अंध विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत चमकदार कामगिरी केली आहे. कैफी व्यतिरिक्त सुमंत पोद्दारने ९०.०८ टक्के मिळविले.