ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. ३ - भारतीय लष्करात 'फिल्ड मार्शल' हा सर्वोच्च सन्मान मिळवणारे पहिले अधिकारी अशी जनरल सॅम माणकेशॉ यांची ओळख... मात्र गुजरात सरकारच्या मते ते एक खेळाडू होते. गुजरात सरकारच्या वेबसाईटवर ' लँड ऑफ लिंजड्स' (गुजरातमधील महान व्यक्तीमत्व) या विभागात माणकेशॉ यांचा उल्लेख क्रीडा क्षेत्रात करण्यात आला आहे.
१९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात सॅम माणकेशॉ लष्कराचे यशस्वी नेतृत्व केले होते. ते ' सॅम बहाद्दूर' या नावानेही प्रसिद्ध होते. चाळीस वर्षांच्या लष्करी कारकिर्दीत माणकेशॉ दुसरे महायुद्ध, पाकिस्तानविरुद्धची तीन युद्धे आणि चीनसोबतच्या युद्धात सहभागी होते. लष्करातील एवढा दैदिप्यमान इतिहास असलेल्या माणकेशॉ यांना गुजरात सरकारने मात्र ' खेळाडूं'च्या पंक्तीत स्थान दिले आहे.
या वेबसाईटमध्ये अशा अनेक चुका आहेत. जनरल राजेंद्रसिन्हजी जाडेजा यांचे नावही खेळाडूंच्या विभागात लिहीण्यात आले आहे. तर गुजरातमध्ये शैक्षणिक क्रांती घडवणारे गिजूभाई बधेका यांना जमशेदजी टाटा, प्रेमचंद रायचंद आणि कस्तुरभाई लालभाई यांच्यासोबतीने उद्योजकांच्या यादीत बसवण्यात आले आहे. १८८५ साली जन्मलेले बधेका हे मूलत: एक वकील होते. तर वाघेला राजवंशाच्या काळात प्रसिद्ध जैन मंदिरांची वास्तू उभारणारे १३ व्या शतकातील वास्तुशास्त्रज्ञ वास्तुपाल तेजपाल यांना उद्योजक संबोधण्यात आले आहे. भगवान कृष्ण आणि मीराबाई यांना साहित्याच्या विभागात स्थान देत त्यांना साहित्यकार संबोधण्यात आले आहे.
मात्र या सर्व चुकांचे खापर सरकारी अधिका-यांनी ही वेबसाईट सांभाळणा-या खासगी कंपनीवर फोडले आहे. ' ही वेबसाईट अपडेट करण्याचे काम गुजरात सरकारकडे नसून ते एका खासगी कंपनीकडे सोपवण्यात आले आहे' असे सांगत सामान्य प्रशासन विभागातील अधिका-यांनी आपली जबाबदारी झटकली आहे.