काँग्रेसच्या प्रचार देखरेख समितीच्या प्रमुखपदी सॅम पित्रोदा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 01:55 AM2019-03-27T01:55:09+5:302019-03-27T01:55:33+5:30
आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्रचारावर देखरेख ठेवण्यासाठी पक्षाने नेमलेल्या समितीच्या प्रमुखपदी सॅम पित्रोदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या प्रचारावर देखरेख ठेवण्यासाठी पक्षाने नेमलेल्या समितीच्या प्रमुखपदी सॅम पित्रोदा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पित्रोदा हे गांधी घराण्याचे विश्वासू सल्लागार तसेच दूरसंचार क्षेत्रातील ख्यातनाम तज्ज्ञ आहेत. प्रचार देखरेख समितीमध्ये काँग्रेस नेते पवन खेरा, रोहन गुप्ता, प्रवीण चक्रवर्ती, प्रियंका चतुर्वेदी, दिव्या स्पंदना, मनीष चत्रथ यांचाही समावेश करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेसकडून केल्या जाहिराती तसेच प्रचार मोहिमांची देखरेख ही समिती करेल. अन्य पक्षांच्या प्रचारावरही समितीचे लक्ष असेल. त्यातील उणिवा लक्षात घेऊन काँग्रेसच्या प्रचारामध्ये बदल सुचविण्याचे कामही या समितीकडे आहे. लोकसभा निवडणुकांत पक्षाच्या जाहिराती कशा पद्धतीने द्याव्यात याची सारी तयारीही पूर्ण झाली आहे.
सॅम पित्रोदा ओव्हरसीज इंडियन नॅशनल काँग्रेसचेही अध्यक्ष आहेत. पुलवामा हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. त्यात नेमके किती दहशतवादी मारले गेले असा सवाल पित्रोदा यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत विचारला होता. आपण ही विचारणा कोणत्याही पक्षातर्फे नव्हे तर एक नागरिक म्हणून करत आहोत असेही ते म्हणाले होते. त्यावरून भाजपा नेत्यांनी पित्रोदा यांच्यावर तोंडसुख घेतले होते.