Sam Pitroda on Rahul Gandhi : काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन आपले विचार मांडले. दरम्यान, यावेळी गांधी घराण्याचे निटकवर्तीय आणि इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींचे (Rahul Gandhi) भरभरुन कौतुक केले आहे. तसेच भाजपच्या 'पप्पू' टीकेवरही पलटवार केला.
राहुल गांधी पप्पू नाहीतटेक्सासमधील एका कार्यक्रमात बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले की, "राहुल गांधी आता पप्पू नाहीत. ते खूप हुशार, शिक्षित आणि उत्तम रणनीतिकार आहेत. त्यांचा कोणत्याही विषयावर सखोल अभ्यास आहे. देशातील मोठ-मोठे प्रश्न सोडवणे, हा राहुल गांधींचा अजेंडा आहे. त्यांच्याकडे असे व्हिजन आहे, ज्यासाठी भाजप करोडो रुपये खर्च करते. गेल्या दहा वर्षांपासून भाजप त्यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवत आहे. माझा राहुलवर पूर्ण विश्वास आहे. भारताला सध्या जुमल्यांची नाही, तर आधुनिक विचारसरणी आणि तरुण नेत्यांची गरज आहे," अशी प्रतिक्रिया पित्रोदांनी दिली.
राहुल गांधी आपल्या वडिलांपेक्षा जास्त हुशार;सॅम पित्रोदा यांनी राहुल गांधींचे कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी अनेकदा त्यांचे कौतुक केले आहे. अलीकडेच पीटीआयला वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधींची तुलना दिवंगत राजीव गांधी यांच्याशी केली होती. "राहुल गांधी आपल्या वडिलांपेक्षा जास्त हुशार आहे. बौद्धिक असण्यासोबतच ते एक उत्तम रणनीतीकारदेखील आहेत. राजीव जास्त मेहनती होते. दोघांचा डीएनए एकच आहे. दोन्ही नेते आयडिया ऑफ इंडियाचे पुरस्कर्ते आहेत," असे पित्रोदा म्हणाले होते.
राहुलची प्रतिमा डागाळली "राहुल गांधी यांची चुकीची प्रतिमा तयार करण्यात आली. त्यांची बदनामी करण्यासाठी कोट्यवधी डॉलर्स खर्च केले. पण, राहुल यांची खरी प्रतिमा आता समोर येत आहे. त्यांच्या दोन भारत दौऱ्यांचा यात खूप फायदा झाला. याचे संपूर्ण श्रेय मी राहुलला देतो. राहुल बराच काळ लढले आणि यातून बाहेर आले. त्यांच्यात पंतप्रधान होण्याचे सर्व गुण आहेत. एखाद्या व्यक्तीवर, त्याच्या कुटुंबावर, त्याच्या वारशावर, पक्षावर दिवसरात्र हल्ला करणे वाईट आहे. हे लोक जाणूनबुजून खोटं बोलतात, फसवतात आणि चुकीची माहिती पसरवतात. माध्यमांवर कुणाचे तरी नियंत्रण असल्याचे जनतेच्या लक्षात येऊ लागले आहे," असेही सॅम पित्रोदा म्हणाले होते.
संबंधित बातमी- "भारतात आता कोणी पंतप्रधान मोदींना घाबरत नाही..."; राहुल गांधींचं भाजपा, RSS वर टीकास्त्र