नवी दिल्ली - पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यासंदर्भात समाजवादी पार्टीचे राज्यसभेतील खासदार नरेश अग्रवाल यांनी वादग्रस्त विधान केले आहे. कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानकडून मिळणारी वागणूक व त्यांना भेटायला गेलेल्या त्यांच्या आई-पत्नीचा करण्यात आलेल्या अपमानाबाबत भारतात संताप व्यक्त होत असतानाच समाजवादी पार्टीच्या नरेश अग्रवाल यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
'जर पाकिस्तान कुलभूषण जाधव यांना दहशतवादी मानत असतील तर ते त्याच दृष्टीनं व्यवहार करतील', असे विधान नरेश अग्रवाल यांनी केले आहे. पुढे ते असेही म्हणाले की, 'आपल्या देशातील दहशतवाद्यांसोबतही अशाच पद्धतीनं कठोर व्यवहार केला पाहिजे. तसंच पाकिस्तानच्या कारागृहांत शेकडो भारतीय नागरिक बंद आहेत, तर जाधव यांच्याव्यतिरिक्त त्यांच्यासंदर्भातही बोलणी व्हायला हवीत'.
कुलभूषण जाधव यांच्या पत्नीचे बूट केले जप्त
पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव भेटीदरम्यान त्यांच्या पत्नी व आई यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आल्यानं भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार, कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी खोलीत जाण्यापूर्वी जाधव यांच्या पत्नी व आईला त्यांची पादत्राणे बाहेर काढून ठेवायला सांगितले गेले. मात्र भेटीनंतर, वारंवार विनंती करूनही जाधव यांच्या पत्नीला त्यांचे बूट परत दिले गेले नाहीत. असे का केले गेले हे अनाकलनीय आहे.
हेरगिरी आणि विध्वंसक कारवाया केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा झालेले भारतीय नौदल माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या पत्नी व आईने सोमवारी (25 डिसेंबर) इस्लामाबादमध्ये त्यांची घेतलेली भेट ‘दबाव आणि भीतीच्या वातावरणात’ घडवून आणून पाकिस्तानने वचनभंग केल्याचा आरोप भारताने केला आहे.
कुलभूषण जाधव यांच्या पत्नीच्या बुटात संशयास्पद गोष्ट असल्या कारणानं सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे बूट जप्त करण्यात आल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. तसंच पाकिस्तान भारतासोबत विनाकारण शब्दांच्या लढाईत पडू इच्छित नाही, असादेखील कागांवा करण्यात आला आहे.
भारताच्या चिंता गंभीर असल्या असत्या तर जाधव यांच्या पत्नी-आईनं किंवा उप-उच्चायुक्तांनी भेटीदरम्यान उपस्थित असलेल्या मीडियासमोर त्या मांडल्या असत्या. दरम्यान, जाधव यांच्या पत्नीच्या बुटांची तपासणी सुरू असल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते फैसल मोहम्मद यांनी सांगितले.
कुलभूषण यांची आई अवंती व पत्नी चेतनकुल यांनी इस्लामाबादहून परत आल्यानंतर मंगळवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध करून सोमवारची भेट ज्या पद्धतीने आयोजित केली गेली त्याबद्दल पाकिस्तानवर टीका केली. या भेटीच्या निमित्ताने जाधव यांच्यावरील धादांत खोट्या आरोपांना बळकटी देण्याची संधी घेण्याचा प्रयत्न करून पाकिस्तानने विश्वासार्हता पार गमावली, अशीही माहिती प्रवक्त्यानं दिली आहे.
प्रवक्ता म्हणाला की, ही भेट कशा पद्धतीने व्हावी याचा सर्व तपशील दोन्ही देशांच्या राजनैतिक अधिका-यांनी आपसात चर्चा करून आधी ठरविला होता. त्यानुसार भारताने ठरल्याप्रमाणे आपली बाजू चोखपणे पार पाडली. परंतु पाकिस्तानने मात्र दिलेला शब्द पाळला नाही.यासंदर्भात प्रवक्त्याने प्रामुख्याने चार बाबींचा आवर्जून उल्लेख केला.
१) माध्यम प्रतिनिधींना जाधव यांच्या पत्नी व आईच्या जवळ जाऊ द्यायचे नाही, असे ठरले असूनही पाकिस्तानी माध्यमांच्या प्रतिनिधींना त्यांच्या अगदी जवळ जाऊ दिले गेले. जवळ आल्यावर या प्रतिनिधींनी या दोघींचा पिच्छा पुरवून त्यांना त्रास दिला व जाधव यांच्याविषयी अपमानास्पद भाष्ये केली.
२) सुरक्षेच्या नावाखाली या दोघींच्या सांस्कृतिक व धार्मिक भावनांचा अनादर केला गेला. यात त्यांना मंगळसूत्र, बांगड्या व कपाळावरील टिकलीही काढून ठेवायला लावली व सुरक्षेच्या दृष्टीने गरजचे नसूनही पेहराव बदलायला लावला.
३) जाधव यांच्या आईची मातृभाषा मराठी असल्याने त्यांनी मुलाशी त्या भाषेत बोलणे स्वाभाविक होते. परंतु त्या मराठीत बोलू लागल्यावर वारंवार त्यांना थांबविले गेले व शेवटी मराठी बोलणे बंद करायला लावले गेले.
४) भेटीच्या वेळी पाकिस्तानमधील भारतीय उप उच्चायुक्त जे. पी. सिंग हजर राहू शकतील, असे आधी ठरले होते. परंतु ऐनवेळी न कळवताच त्यांना या दोघींपासून वेगळे केले गेले. सिंग यांच्या गैरहजेरीतच भेट सुरू केली गेली. संबंधितांकडे आग्रह धरल्यावर सिंग यांना आत प्रवेश दिला गेला; पण तरीही त्यांना आणखी एका तावदानापलीकडे उभे करून प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणी हजर राहू दिले गेले नाही.प्रवक्ता म्हणाला की, भेटीविषयी जी माहिती मिळाली त्यावरून या दोघींच्या दृष्टीने भेटीचे एकूणच वातावरण दबाव आणि भीतीचे होते. तरीही त्यांनी मोठ्या धैर्याने व निग्रहाने त्यास तोंड दिले.
प्रकृतीविषयी चिंताभेटीच्या वेळी कुलभूषण जाधव कमालीच्या दबावाखाली होते व ते बळजबरी केल्यासारखे बोलत होते. त्यांची बहुतांश वक्तव्ये, त्यांच्याविरुद्धच्या खोट्या आरोपांना बळकटी देण्यासाठी, पढवून घेतल्यासारखी वाटत होती. त्यांची एकूण भावमुद्रा त्यांच्या प्रकृती व ख्यालीखुशालीबद्दल चिंता निर्माण करणारी होती. - प्रवक्ता, परराष्ट्र मंत्रालय